‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ कार्यक्रमात तज्ज्ञांकडून आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र

वसई : दिलखुलास जगा, आवडीचा छंद जोपासा आणि तणावापासून दूर रहा तसेच संध्याकाळी सातच्या आत जेवण करा तरच आरोग्यदायी जीवन जगता येईल, असा मूलमंत्र रविवारी वसईत झालेल्या ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. वसईच्या आनंद नगर येथील विश्वकर्मा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ डॉ. आशीष फडके यांनी ‘तणावरहित जीवन कसे जगावे?’ या विषयावर आणि आहारतज्ज्ञ डॉ. अरुणा टिळक यांनी ‘पौष्टिक आहार’ यावर मार्गदर्शन केले.

पहिल्या सत्रात आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ डॉ. आशीष फडके यांनी तणावातून मुक्त कसे व्हायचे, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे या विषयावर मार्गदर्शन केले. लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात ताण असतोच. ताणाला आपण कसे सामोरे जातो यावर त्याचा चांगल्या-वाईट परिणाम होत असतो. या वेळी डॉ. फडके यांनी तणावाचे प्रकार, त्याची कारणे, तणावाचे टप्पे, तो कसा ओळखायचा, तणाव कमी करण्याच्या सोप्या पद्धती, आसने आणि व्यायाम यावर मार्गदर्शन केले.

डॉ. फडके यांनी तणाव दूर करण्याचे सोपे उपाय सांगितले. सर्वात प्रथम आपला दिनक्रम निश्चित करा आणि त्याचे वेळापत्रक तयार करा, नेहमीच्या कामांची यादी तयार करा, पुढचा विचार करून त्याचे नियोजन करा, एकदम मोठय़ा लक्ष्याकडे धाव घेण्यापेक्षा त्या मार्गावर जाण्यासाठीची लहान लहान लक्ष्ये गाठा, असे त्यांनी सांगितले. आपल्या दररोजच्या व्यग्र वेळापत्रकातून थोडी विश्रांतीही घ्यायला हवी, कामात बदल करावा, आवड असलेल्या गोष्टी करा, छंद जपा, इतरांशी संवाद साधा, दिलखुलासपणे हसा आणि रडा, असा सल्ला डॉ. फडके यांनी या वेळी दिला.

दुसऱ्या सत्रात आहारतज्ज्ञ डॉ अरुणा टिळक यांनी ‘पौष्टिक आहार’ यावर मार्गदर्शन केले. चांगला पौष्टिक आहार घ्यायचा असेल तर ऋतूनुसार येणाऱ्या फळभाज्यांचा आहारात वापर करावा. ऋतूनुसार आहारात बदल करणे गरजेचे आहे, असा  सल्ला डॉ. टिळक यांनी दिला. रोजच्या जेवणातील आहार कशा प्रकारे असला पाहिजे आणि त्याचे सेवन कशा प्रकारे केले पाहिजे याची विस्तृत माहिती त्यांनी दिली. आयुर्वेदानुसार आहार कसा घ्यावा आणि विविध पदार्थाची मात्रा किती असावी यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

आहारात साजूक तुपाचा वापर नेहमी करावा. तूप हे बुद्धीला चालना देण्यास मदत करते. काही जण कोलेस्ट्रॉल वाढेल या भीतीने तूप खात नाहीत. मात्र हा गैरसमज असल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्हाला तुमचे आरोग्य सदृढ ठेवायचे असेल तर जास्त करून आहारात येणारे पदार्थ संस्कारित करून खाल्ले पाहिजेत. हल्लीचे तरुण पौष्टिक आहाराऐवजी जंक फूडकडे वळले आहेत. ज्यातून आपल्या आरोग्याला कोणताच फायदा होत नाही आणि कोणतीच जीवनसत्त्वे त्यातून मिळत नाहीत. या पदार्थामुळे तामस गुण वाढतो, चिडचिड वाढते आणि हे पदार्थ फक्त वजन वाढवण्याचे काम करतात, असे त्यांनी सांगितले. संध्याकाळी ७ पर्यंत रात्रीचे जेवण घ्यायलाच हवे, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.

या वेळी श्रोत्यांनी विविध प्रकारचे प्रश्न विचारले. त्याचे तज्ज्ञांनी मार्गदर्शन करून शंकानिरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलजा तिवले यांनी केले.