माजी नौदल अधिकाऱ्याच्या शोधात पोलीस; ८० महिलांची फसवणूक झाल्याचे उघड

रॉ या भारतीय गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी असल्याचे भासवून ऑनलाइन विवाह संस्थांच्या माध्यमातून अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या माजी नौदल अधिकाऱ्याचा भाईंदर पोलीस सध्या शोध घेत आहेत. आतापर्यंत सुमारे ८० महिलांची फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

संजय प्रकाश राणे असे स्वत:चे नाव सांगणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीवर काशिमीरा पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये एका तरुणीने फसवणूक केल्याची तक्रार केली होती. ऑनलाइन विवाह संस्थेत स्वत:चे नाव नोंदवून राणे याने या तरुणीशी ओळख निर्माण केली. आपण रॉचा अधिकारी असल्याची थाप त्याने ठोकली होती. राणे याने या तरुणीकडून २२ लाख रुपये घेतले होते. नंतर मात्र तो तिला सतत टाळत होता. तरुणीला संशय आल्याने तिने त्याच्यावर पाळत ठेवली. त्यावेळी तो काशिमीरा येथील एका लॉजमध्ये असल्याचे तिला समजले. पोलिसांनी त्याला त्यावेळी लॉजमधून अटक केली. राणेकडे स्वत:चा जामीन करण्यासाठी पैसे नसल्याने तो तब्बल दीड वर्षे तुरुंगातच होता.

मात्र दरम्यानच्या काळात या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्याकडे सोपवण्यात आला. कांबळे यांनी आरोपीचे लॅपटॉप, मोबाइल जप्त केले, त्याचे ई-मेल तपासले. त्यावेळी त्याने अनेक नावांनी विविध प्रकारची प्रोफाईल बनवली असल्याचे तसेच त्याचे नाव संजय राणे नसून संजय अडसूळ असे असल्याचे समजले.

त्याच्या ई-मेल तपासणीत मिळालेल्या एका मोबाइलवर पोलिसांनी संपर्क साधला असता तो फोन सिमला येथील एका महिलेचा होता. या महिलेशीही संजयने लग्न केले होते. अधिक चौकशीत संजयने अनेक तरुणींशी लग्न केले असून त्याने अनेक तरुणींकडून पैसे उकळले असल्याचे समजले. संजय याने सात ते आठ र्वष नौदलात नोकरी केली, नौदलाच्या सेवेतूनही तो पळून आला. याबाबतचे पत्र नौदलाने पोलिसांकडे दिले आहे.

पोलिसांनी अखेर न्यायालयात संजय विरोधात पुन्हा नव्याने आरोपपत्र दाखल करून त्याची संपूर्ण माहिती न्यायालयात सादर केली. त्यानंतर न्यायालयाने त्याची दीड वर्षांने वैयक्तिक बाँडवर सुटका केली. मात्र त्यानंतर संजय बाँड भरण्यासाठीही न्यायालयात आला नाही आणि नंतर तो फरार झाला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.