नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आजारी असलेल्या पाळीव श्वानाला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला म्हणून संतापलेल्या मालकासह त्यांच्या पत्नी व मुलीने प्राणिमित्र संघटनेत कार्यरत असलेल्या एका युवतीला आणि तिच्या भावाला बेदम मारहाण केल्याची घटना नौपाडय़ात सोमवारी रात्री घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

तेजस्वी सुभाष आरोटे (२८) आणि सिद्धेश आरोटे (२१) अशी मारहाणीत जखमी झालेल्या बहीण-भावाची नावे असून ते ठाण्यातील पाचपखाडी भागात राहतात. हे दोघेही गेल्या आठ वर्षांपासून पावा इंडिया प्राणिमित्र संघटनेमध्ये काम करीत आहेत. सोमवारी रात्री तेजस्वी स्कूटरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेली होती. त्या वेळेस वंदना एसटी स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिला लॅब्रोडॉर जातीची एक पाळीव मादी श्वान दिसली. ती अतिशय कुपोषित दिसत होती. तसेच तिला त्वचारोग झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे तिच्यावर उपचार व्हावेत म्हणून तेजस्वीने तिच्या मालकाची भेट घ्यायचे ठरविले. त्यासाठी तिने भाऊ सिद्धेश याला बोलावून घेतले. त्यानंतर एका मित्राच्या आईच्या मदतीने दोघे त्या श्वानाचे मालक देविसिंग राजपूत यांच्या घरी पोहोचले. तिथे देविसिंग यांची भेट घेऊन त्यांनी श्वानाला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यावर श्वानाच्या उपचाराचा खर्च तुम्ही करणार आहात का, अशी उलट विचारणा देविसिंग यांनी केली असता, तुमचा श्वान असल्यामुळे तुम्हीच खर्च केला पाहिजे, असे दोघांनी त्यांना सांगितले. त्यामुळे संतापलेल्या देविसिंग, त्यांची पत्नी तुलसी आणि मुलगी हर्षां कामठे या तिघांनी दोघांना काठीने व बॅडमिंटन रॅकेटने मारहाण केली. यामध्ये तेजस्वी ही गंभीर जखमी झाल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दोन दिवसांच्या उपचारानंतर गुरुवारी सकाळी तेजस्वीला घरी सोडण्यात आले आहे. याप्रकरणी तेजस्वीने दिलेल्या तक्रारीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात देविसिंग, त्याची पत्नी तुलसी आणि त्याची मुलगी हर्षां या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.