भविष्यातील महानगरपालिका समोर ठेवून निर्मिती
महापालिकेच्या उंबरठय़ावर असलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाचे विशेष अनुदान, एमएमआरडीए आणि परिषद अशा एकत्रित निधीच्या माध्यमातून उभारणी केली जाणार आहे.
अंबरनाथ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे प्रशासकीय कामही मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. सध्याची नगर परिषदेची इमारत ही १९७८ मधील असून ती तत्कालीन नगराध्यक्ष दादासाहेब नलावडे यांच्या कार्यकाळात उभारण्यात आली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून वाढलेला प्रशासकीय पसारा आणि इमारतीची झालेली दुरवस्था, यामुळे कामे करणे अवघड होत आहे. सुरुवातीला बीओटी तत्त्वावर प्रशासकीय इमारतीची बांधणी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र नंतर मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करून इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावले उचलण्यात आली. आता नव्या प्रशासकीय इमारतीसाठी राज्य शासनाचे ५ कोटी, पालिकेच्या तिजोरीतून ५ कोटी तर एमएमआरडीएकडून १० कोटींच्या निधीच्या मागणीतून एकूण २० कोटी रुपयांच्या निधीतून उभारणी केली जाणार आहे. या प्रस्तावाला लागणारी मंजुरी, कंत्राटाच्या निविदा प्रक्रिया पार पाडत मे २०१७ पर्यंत इमारतीची उभारणी करण्याचा पालिकेचा मानस आहे.
दरम्यान, पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. सुरुवातील मागील बाजूने काम सुरू होणार असून त्यानंतर संबंधित विभागांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या काळात मुख्याधिकारी आणि पालिकेचे महत्त्वाचे अधिकारी पालिकेच्या शिवदर्शन बंगल्यातून कामकाज चालवतील.