ठाणे : महाराष्ट्र राज्य गुंडांच्या हातात जात आहे आणि पोलीस निष्प्रभ ठरत आहेत. ज्यांच्या मागे राजाश्रय असतो तो जिवंत राहतो, बाकीचे सर्व मारले जातात त्याला पोलीसस्टेट म्हणतात. या पोलीस स्टेटची निर्मिती आता महाराष्ट्रात होऊ लागली आहे. याचा मी निषेध करतो, असे सांगत महाराष्ट्र हे गुंडाराष्ट्र झाल्याचे मत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात व्यक्त केले. महाराष्ट्राची ही अधोगती थांबवायची असेल तर आपल्यासमोर दोनच पर्याय आहे. एकतर निष्ठावान माणसाच्या मागे उभे रहा किंवा गद्दारांना मतदान करा. यामुळे मतदान विचार करुन करा, महाराष्ट्र वाचवायचा असेल तर गद्दारांना गाडून टाका, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख व वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून डाॅ जितेंद्र आव्हाड बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यामध्ये हल्ला झाला. पोलीस आजुबाजुला असताना निखिल वागळे यांना मारण्यात आले. त्यांची गाडी फोडण्यात आली. अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या मारण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जायचे. आता महाराष्ट्र हे गुंडाराष्ट्र म्हणून ओळखले जावू लागले आहे. जनता जोपर्यंत उद्रेक करत नाही, तोपर्यंत हे घटनाबाह्य सरकार असेच चालू राहील. हे वर्ष निवडणुकांच वर्ष आहे. काम होतच राहतात, पाणी येतच राहील, लाईट लागतच राहील, राजकारणी राजकारण करतच राहतील पण जनतेने काय करायच आहे ? याचा विचार जनतेने करायला हवा, असे मत आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा – नमो नमो करत शिंदे गट भाजपच्या वाटेवर, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांची शिंदे गटावर टीका

हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आहे, हा महाराष्ट्र एस. एम. जोशी यांच्या विचारांचा आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार सांगणारा आहे. या महाराष्ट्रात जर असे होत असेल तर ती सर्वांसाठी लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. मतदार निवडून देत असतात. पण, त्या मतदारांना निर्णय घ्यावा लागेल, की महाराष्ट्र हातात राहू द्यायचा की, महाराष्ट्राची अशी अधोगती चालू ठेवायची. जर तुम्हाला ती थांबवायची असेल तर तुम्हाला दोनच पर्याय आहेत, एकतर निष्ठावान नरेश मणेरा यांच्यासारख्या माणसाच्या मागे उभे रहा नाहीतर गद्दारांना मतदान करा. तुम्हाला महाराष्ट्रात सूर्याची पिसाळांची अवलादी हव्या आहेत की ज्यांनी छातीचा कोट करून महाराजांचा जीव वाचवला होता तसे शिवा काशीद हवेत, हा निर्णय तुमचा आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – राज्यातील आशा सेविकांचा संप सुरूच राहणार, मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ठाण्यातच ठाण मांडण्याचा निर्णय

या महाराष्ट्राच्या मातीचा स्पर्श माझ्या कपाळाला झाला आहे, त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करतो की मतदान विचार करुन करा, महाराष्ट्र वाचवायचा असेल तर गद्दारांना गाडून टाका, काल अभिषेक घोसाळकर होता, आज निखिल वागळे आहे, उद्या मी असेन, नरेश मणेरा असेन, राज्यातील पोलीस आता हतबल झालेत, पोलीसी कारभारात आता राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. ज्याला १९४५ साली पोलीस स्टेट म्हणायचे, त्यासारखे हे महाराष्ट्र राज्य गुंडांच्या हातात जात आहे आणि पोलीस निष्प्रभ ठरत आहेत. ज्यांच्या मागे राजाश्रय असतो तो जिवंत राहतो, बाकीचे सर्व मारले जातात त्याला पोलीसस्टेट म्हणतात. या पोलीसस्टेटची निर्मिती आता महाराष्ट्रात होऊ लागली आहे. याचा मी निषेध करतो, लोकशाही मारली जात असताना मी आनंदोत्सव साजरा करु शकत नाही, असेही ते म्हणाले. सध्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे ते लज्जास्पद आहे. महाराष्ट्राचे वाटोळे करायला निघालेल्या या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. पोलिसांसमोरच, आम्ही सभा उधळू, अशी धमकी दिली जाते आणि पोलीस संरक्षणात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला केला जातो. पण गुन्हेगारांना अटक केली जात नाही. हल्लेखोरांवर ३०७, १२० क अन्वये कलम लावून गुन्हे दाखल करावेत अशी जाहीर मागणी त्यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra has become a gangster state says jitendra awhad ssb