अस्सल मराठमोळी खाद्यपरंपरा जाणून घ्यायची असेल आणि मराठमोळे खाद्यपदार्थ चाखायचे असतील तर वसईमध्ये ‘मराठी कट्टा’ या उपाहारगृहाशिवाय दुसरा पर्याय नाही. या उपाहारगृहात गेल्यावर मराठी खाद्यसंस्कृती किती मोठी आहे, याची जाणीव होते. कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, पिठलं-भाकरी, मिसळ, मराठमोळे मांसाहारी पदार्थ आदी खाद्यान्न खवय्यांचे मन आणि रसना दोन्ही तृप्त करतात.

वसईतील वीरेंद्र पाटील यांनी हे उपाहारगृह सुरू केले आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतल्यानंतर पाटील यांनी लोणावळा व मुंबईतील हॉटेलमध्ये चार वष्रे नोकरी केली. त्यानंतर एका अभियांत्रिक महाविद्यालयाचे कँटीन सांभाळले. मात्र आपण स्वत: काही तरी व्यवसाय करावा आणि मराठमोळे खाद्यपदार्थ वसईकरांना मिळावे यासाठी त्यांनी ‘मराठी कट्टा’ सुरू केला. पाटील यांचे कोल्हापुरी पदार्थावर खास प्रेम. त्यामुळे या उपाहारगृहातील कोल्हापुरी पदार्थ म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच. कोल्हापुरी पदार्थ चांगल्या पद्धतीने बनावता यावे यासाठी त्यांनी चक्क कोल्हापूर येथील ‘मालन’ या खानावळीमध्ये काम करत ते पदार्थ बनवण्याचे शिक्षण घेतले.

कोल्हापुरातील ‘तांबडा-पांढरा रस्ता’ ही डिश तर महाराष्ट्रात प्रसिद्ध. ‘मराठी कट्टा’मध्ये ही डिश उपलब्ध असल्याने खवय्यांची तिथे नेहमीच गर्दी असते. यामधील तांबडा रस्सा हा मटण-चिकन स्टॉक आणि कोल्हापुरी लाल मसाला यांच्या मिश्रणातून बनवला जातो, तर पांढरा रस्सा हा मटण-चिकन स्टॉक आणि नारळाचे दूध यांच्या मिश्रणातून बनविला जातो.  हॉटेलमधील स्पेशल चिकन थाळी किंवा मटण थाळी घेतली असता त्यासोबत हमखास हा रस्सा दिला जातो.

या उपाहारगृहात मराठी पदार्थाशिवाय अन्य पदार्थाना स्थान नाही. खास कोल्हापुरी पद्धतीने तयार केलेल्या घरगुती मसाल्यांमध्येच पदार्थ तयार केले जातात. वीरेंद्र व त्यांचा भाऊ किरण यांच्या देखरेखीखाली हे मसाले बनवले जातात. ‘मेथी पिठलं’ हा पदार्थही येथे खूपच लोकप्रिय आहे. तेलावर राई- जिरे, कांदा यांची फोडणी दिली की त्यात मेथी आणि भाजलेले बेसन यांचे मिश्रण करून अगदी एका मिनिटात हा पदार्थ तयार केला जातो. या पदार्थासह या उपाहारगृहात भरलेली वांगी, कांदा पिठलं, भेंडी मसाला, शेवभाजी, मटकीची भाजी, मशरुम मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, अंडा करी, शाकाहारी थाळी, चिकन थाळी आदी पदार्थ खाण्यासही खवय्यांची येथे गर्दी असते.

चिकन सुका ही त्यांची आणखीन एक स्पेशल डिश. कांदा तेलावर परतवल्यानंतर हॉटेलमध्येच बनवलेला विशेष ओला मसाला आणि कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला (सुकी चटणी) यांच्या मिश्रणातून चिकन सुका तयार केले जाते. हा मसाला तब्बल तीन प्रकारच्या लाल मिरच्या आणि गरम मसाले यांपासून बनवला जातो. त्यामुळे या चिकन सुकाच्या चवीमध्ये भर पडते आणि कोल्हापुरी स्वाद मिळतो. परंतु या प्रकारचे झणझणीत तिखट पदार्थ खाण्याची सवय मुख्यत: वसईच्या खवय्यांना नसल्याने ते गृहीत धरून त्याहून कमी तिखट पदार्थ दिले जातात. येथे मिळणारा मिरचीचा ठेचा तर अप्रतिमच आहे.

खास रविवारी येथे मटकीची मिसळ नाश्त्यासाठी बनवली जाते. या उपाहारगृहात एक विशेष प्रकारचा भात मिळतो. आले-लसूण-कांदा आणि गरम मसाला परतवून त्यानंतर त्यावर राइस टाकून शिजवलेला भात येथे मिळतो. विदर्भातील सावजी मसाल्यामध्ये बनवलेले पदार्थ येत्या आठवडय़ाभरात सुरू करणार असल्याचे वीरेंद्र सांगतात.

हे उपाहारगृह खास मराठमोळे वाटावे यासाठी वीरेंद्र यांनी विशेष मेहनत घेतली आहे. उपाहारगृहाची सजावटही मराठमोळ्या परंपरेला साजेशी अशी केली आहे. मराठी कविता, अभंग यांच्या पाटय़ा, मराठी संस्कृती दर्शवणारी चित्रे यांचा वापर करून उत्कृष्ट सजावट करण्यात आली आहे.

मराठी कट्टा

  • पत्ता : २४, गोकुळ पार्क, मानव मंदिर, ६० फुटी रास्ता, अंबाडी रोड, वसई (पश्चिम)
  • वेळ : दुपारी १२ ते ३.३०, रात्री : ७.४५ ते १०.४५.