scorecardresearch

डोंबिवलीतील खड्डय़ांवर मीम्स, वात्रटिका

‘विमान खडखडले – बाई गं, डोंबिवली आले की काय’ खड्डय़ांवरून पालिकेवर टीकास्त्र

डोंबिवलीतील खड्डय़ांवर मीम्स, वात्रटिका

‘विमान खडखडले – बाई गं, डोंबिवली आले की काय’ खड्डय़ांवरून पालिकेवर टीकास्त्र

डोंबिवली : डोंबिवली, कल्याण परिसरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पालिका खडी टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करते, पण सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे या कामांची नासाडी होत आहे. या खड्डय़ांवरून रहिवाशांनी विविध प्रकारच्या मीम्स, वात्रटिका तयार केल्या आहेत. त्या समाजमाध्यमांवर फिरवून पालिकेची खिल्ली उडवली जात आहे.

एकीकडे खड्डय़ांचे दुखणे, ते कधी भरले जातील असे प्रश्न रहिवाशी, प्रवाशांच्या मनात असताना दुसरीकडे खड्डय़ांवर हास्य-फवारे उडविणाऱ्या मीम्स, चुटके, वात्रटिका खड्डय़ांवरून रहिवाशांचे मनोरंजन करीत आहेत. हसून मुरकुंडी वळविणाऱ्या मीम्स, चुटके वाचून किमान कल्याण-डोंबिवली पालिकेने खड्डे भरण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी रहिवाशांची मागणी आहे. ‘एकमेकांना शिवीगाळ करताना खड्डय़ात जा, असे म्हणण्याऐवजी शिवी वगळून तू कल्याण-डोंबिवलीत (खड्डे नगरी) जा,’ इडलीपात्राचे साचे करण्यासाठी उत्पादकांनी डोंबिवलीतील खड्डय़ांच्या मापांवरून ते तयार केले तर दर्जेदार इडल्या तयार होतील, एक आजीबाई विमानाने परदेशात चालल्या होत्या. विमानाला ढगांचा अडथळा आल्यावर विमान हवेत थडथडू लागले. त्या वेळी आजीबाईंनी ‘बाई गं, खड्डय़ांची डोंबिवली आली की काय. मेल्यांनी खड्डय़ांचे दर्शन हवेत पण घडविले,’ घरातील गॅस संपल्याने एका रहिवाशाने मिक्सरमध्ये दूध घेऊन दुचाकीवरून डोंबिवली, कल्याणमधील रस्त्यांवरुन एक तास प्रवास केला. त्या वेळी मिक्सरमध्ये एकाच वेळी दही, ताक, तूप तयार झाले होते, फळांचा रस तयार करण्यासाठी एकाने सफरचंद मिक्सरमध्ये टाकून डोंबिवली, कल्याणमधील रस्त्यांवरून दुचाकीने प्रवास केला. एक तासाच्या आत मिक्सरमध्ये फळांचा रस तयार झाला होता, पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता, असा प्रश्न एका शिक्षकाने विद्यार्थ्यांला केला, बहुतांशी विद्यार्थ्यांनी मीठ, साखर, माती असे पदार्थ सांगितले, पण झोपडपट्टी आणि खड्डय़ांच्या परिसरात राहणाऱ्या एका सामान्य बुद्धीच्या मुलाने मात्र कल्याण- डोंबिवलीतील खड्डे असे हटके उत्तर दिले. चंद्रावरील खड्डे आणि डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्डे यांचे साधर्म्य काय याचा शोध वैज्ञानिकांनी सुरू केला आहे. प्रसंगी चंद्रावरचे खड्डे डोंबिवलीत आणून रस्ते सुस्थितीत राहतील का याचा प्रयोग सुरू आहे. पाठदुखीचा त्रास असणाऱ्या परभणीतील एका रहिवाशाने डोंबिवलीतील खड्डय़ांवरून दुचाकी सलग दोन दिवस चालविल्याने त्याची पाठदुखी बरी झाली. एक प्रसिद्ध अभिनेता चित्रीकरणासाठी गेला होता. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे कुटुंबीय, मित्रांच्या लक्षात आले. हे कोठे झाले तर म्हणाला, डोंबिवलीत गेलो होतो. दुचाकी चालवली. अशा गमतीदार मीम्स, चुटके, वात्रटिका गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर फिरत आहेत. खड्डे बुजवा म्हणून सांगूनही न ऐकणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना तरुणांकडून अशा विनोदी शैलीतून चुचकारले जात आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Memes on dombivli pothole viral on social media zws