सर्वच मंडळांकडून उत्सवाचे नियम धाब्यावर

सार्वजनिक ठिकाणी रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक वापरावर असलेली बंदी, डीजे-डॉल्बीच्या वापरावर असलेले र्निबध, रस्त्यावर अतिक्रमण करण्यास असलेला मज्जाव असे सगळेच नियम धाब्यावर बसवून दिव्यात अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत दांडिया उत्सव सुरू आहे. आधीच या शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त आहे. त्यातच यातील बरीचशी जागा मंडळांनी व्यापल्यामुळे या रस्त्यांवरून पादचाऱ्यांनाही ये-जा करणे कठीण बनले आहे.

सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियमावली तयार करीत ठाणे महापालिका व पोलिसांनी काही र्निबध घातले आहे. मात्र, हे र्निबध दिव्यातील दणदणाटात विरून गेले आहेत. साबे गावातील रस्त्यावर माजी नगरसवेक अशोक पाटील यांच्या मंडळाचा नवरात्रोत्सव साजरा होतो तर मुंब्रा देवी कॉलनी रस्ता येथे अनिल भगत, नगरसेवक शैलेश पाटील, रोशन भगत यांच्या नेतृत्वाखालील मंडळांचे उत्सव आहेत.  शहरातील मुख्य मार्ग असलेल्या मुंब्रा देवी कॉलनी रस्त्याची चिखल आणि खड्डय़ांनी अक्षरश: वाताहत झाली आहे. त्यात नवरात्रोत्सवाच्या मंडपांची भर पडली आहे. दहाची मर्यादा ओलांडून थेट मध्यरात्रीपर्यंत कर्णकर्कश डीजेंच्या आवारात येथे दांडिया खेळला जातो. याबद्दल परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दांडियाच्या दणदणाटाला आवर घालण्याची मागणी केली आहे.  दरम्यान, या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. के. तायडे यांना विचारणा केली असता, ‘दिव्यात फक्त १०-१५ पोलीस कर्मचारी आहेत. आम्ही वेळेत गरबा बंद करण्यासाठी कारवाई करतो. मात्र आमची पाठ फिरताच पुन्हा दांडिया खेळला जातो,’ अशा शब्दांत त्यांनी हतबलता व्यक्त केली. दुसरीकडे, ठाण्याचे उपमहापौर व दिव्याचे नगरसेवक असलेले रमाकांत मढवी यांनी या दणदणाटावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘तरुणांमध्ये सण साजरे करण्याचा उत्साह असतो. मात्र सणांसाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. उत्साहाच्या भरात त्या नियमांची पायमल्ली होते. शासनाने शेवटच्या दोन दिवसांऐवजी चार दिवस वेळेची मर्यादा शिथिल करावी, असे मला वाटते,’ असे ते म्हणाले.