मीरा-भाईंदर महापालिकेत नागरिकांना केवळ एक तास प्रवेश; प्रशासनाचा अजब निर्णय

लोकांच्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी लोकशाहीत ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ असतात. विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात जावेच लागते. स्थानिकांचे लोकप्रतिनिधीगृह असलेले पालिका कार्यालय सर्वसामान्यांसाठी नेहमीच खुले असणे गरजेचे आहे. मात्र मीरा-भाईंदर महापालिकेने मात्र लोकशाहीच्या या उद्देशालाच तिलांजली दिली आहे. महापालिका कार्यालयाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी बंद करण्याचा निर्णय या पालिकेने घेतला आहे. महापालिकेचा कारभार सध्या कडेकोट बंदोबस्तात बंद दरवाजाआड होत असून दिवसातील केवळ एक तास नागरिकांसाठी हे दरवाजे उघडले जात आहेत. कामाचे व्याप सांभाळून महापालिकेच कामासाठी येणाऱ्या नागरिकांना दरवाजे बंद असल्याचे पाहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

पाणी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, परवाना अशा महापालिकेच्या विविध विभागांशी नागरिकांचा सततचा संबंध येत असतो. परंतु आपल्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी आता नागरिकांना प्रवेशच मिळणार नाही. महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार तसेच मुख्यालयातील प्रत्येक मजल्यावरील दारे बंद करून ठेवण्यात आली आहेत. दरवाजांना बायोमेट्रिक यंत्रे बसविण्यात आली असून या यंत्रात ज्यांच्या हाताच्या अंगठय़ाची नोंदणी केली आहे, त्यांच्यासाठीच हे दरवाजे उघडले जातात. त्यामुळे महापालिकेची वास्तू म्हणजे एखाद्या भक्कम तटबंदी असलेल्या किल्ल्यासारखी झाली आहे. प्रवेशद्वाराचे दरवाजे नागरिकांसाठी केवळ दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेतच उघडण्यात येतात. शासनाच्या आदेशानुसार तसेच प्रशासकीय कामात विनाअडथळा गतिमानता यावी यासाठी असा निर्णय घेण्यात आल्याचे समर्थन प्रशासनाकडून केले जात आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की नागरिकांनी वारंवार हेलपाटे घातल्यानंतरही अधिकारी जागेवर सापडत नसल्याने शेवटी मंत्रालयात धाव घ्यावी लागते. यासाठी अधिकाऱ्यांनी दिवसातील एक निश्चित वेळ नागरिकांसाठी राखून ठेवावी आणि या वेळेत त्यांनी आपल्या कार्यालयात उपस्थित राहावे, असे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु या आदेशाची ढाल बनवून प्रशासनाने चक्क नागरिकांच्या महापालिकेतील प्रवेशावरच बंधने आणली आहेत. मुळातच दुपारी अडीच ते साडेतीन ही वेळ नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीची आहे.

दुसरीकडे नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या या वेळेतही अनेक अधिकारी आपल्या कार्यालयात उपस्थितच नसतात. त्यामुळे आपली नेहमीची कामे बाजूला ठेवून निर्धारित वेळेत महापालिकेत धाव घेणाऱ्या नागरिकांच्या पदरी पुन्हा निराशाच येत आहे.

नागरिकांच्या प्रवेशावर इतर कोणत्याही महापालिकेत अशा रीतीने प्रवेशबंदी नसताना नागरिकांवर र्निबध घालण्याचा प्रशासनाचा हा फतवा अन्यायकारक असून त्यांच्या हक्कावर गदा आणणारा आहे.

– ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>