करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. लॉकडाउनच्या सुरूवातीच्या काळात वीज कंपन्यांनी ग्राहकांना मीटर रिडिंगप्रमाणे वीज बिल न पाठवता सरासरीनुसार बिल पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परतु आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यानंतर ग्राहकांना मोठ्या रकमेची बिलं येत असल्याचा तक्रारी अनेकांकडून होत आहे. आता या प्रकरणी मनसेनंही उडी घेत थेट महावितरणलाच इशारा दिला आहे. कोणाच्याही घरातील वीज जोडणी कापली गेल्यास महावितरणचीच वीज जोडणी कापू असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

“लाईट बिल आता करोना इतकंच लोकांना भयंकर वाटायला लागलं आहे. लोकांकडे पैसे नाहीत आणि हे दुप्पट तिप्पट बिल आकारात आहेत. याला काही संदर्भ आहे का? लोकांना इतके बिल का आकारले जात आहे?,” असे सवाल अविनाश जाधव यांनी केले आहेत. “लाईट बिल योग्यप्रकारे द्या आणि कुठल्याही ग्राहकांची वीज जोडणी खंडित करू नका, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महावितरणाचं कनेक्शन खंडित करेल,” असंही ते म्हणाले.

“लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळात ऊर्जामंत्र्यांनी वीज मोफत देण्याचं भाकीत केलं होत. आज बिल नेहमीपेक्षा अनेक पटीने जास्त आकारण्यात आलं असतांना त्या भाकिताचा विचार करावा, जेणेकरून संकटाच्या काळात त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळेल,” असंही जाधव यावेळी म्हणाले.

“करोनाच्या संकटामुळे अनेकजण सध्या घरीच आहेत. त्यामुळे २ हजार रूपयांचं येणारं वीज बिल तीन साडेतील हजारांपर्यंत आल्यास समजू शकते. पण ते थेट २० हजारांपर्यंत कसं होतं. ठाकरे सरकानं दुकान मालकांना, घर मालकांना भाडं न वसुलण्याचं आवाहन केलं. अनेकांनी मनाचा मोठेपणा दाखवून ते केलं. पण आता सरकारनं गेल्या तीन महिन्यांचं बिल माफ करावं,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली,