लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागातील कर विभागातील दोन कर्मचाऱ्यांना ५० हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. योगेश महाले आणि सूर्यभान कर्डक अशी लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कर्डक हे गेल्यावर्षी पालिकेतून कर विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत.

गरीबाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौकात पालिका क्रीडांगणाच्या आरक्षणावर वसंत हेरिटेज ही बेकायदा इमारत आहे. या इमारतीत १७२ सदनिका आहेत. या इमारतीला मालमत्ता कर लावण्यासाठी गेल्या वर्षी ह प्रभागातील कर विभागातील कर्मचारी सूर्यभान कर्डक यांनी तक्रारदाराकडून चार लाख रूपये उकळले होते. परंतु कर्डक यांनी मालमत्ता कर लावला नाही. त्यानंतर ते निवृत्त झाले. चार लाख रूपये घेतल्याने तक्रारदाराने कर्डक यांच्याकडे काम पूर्ण करण्यासाठी तगादा लावला. परंतु कर्डक तक्रारदाराला दाद देत नव्हता. यामध्ये योगेश महाले सहभागी होते. कर्डक रक्कम परत करत नाही, तसेच महाले हे देखील मालमत्ता कर लावून देत नसल्याने तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

आणखी वाचा-प्रेमसंबंधातून टिटवाळ्यातील तरूणाचे अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न

पथकाने पडताळणी केली असता, मंगळवारी पोलीस निरीक्षक विलास मते यांच्या पथकाने ह प्रभाग परिसरातील एका चहाच्या दुकानाजवळ सापळा रचून ५० हजार रूपयांची लाच घेताना कर्डक, महाले यांना ताब्यात घेतले. यापूर्वी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त गणेश बोराडे (निवृत्त) यांना देखील लाच घेताना अशाचप्रकारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. ‘लोकसत्ता’ने क्रीडांगणाच्या आरक्षणावरील बेकायदा इमारतीचे प्रकरण बाहेर काढले आहे. या प्रकरणाची पालिकेकडून चौकशी सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal employees arrested for taking bribe in dombivli mrj
First published on: 06-02-2024 at 21:44 IST