मयूर ठाकूर, लोकसत्ता

भाईंदर : मीरा भाईंदरच्या मेट्रोच्या कामातील कारशेडचा अडथळा दूर झाला असला तरी आता मार्गिकेच्या जागेचा नवीन अडथळा निर्माण झाला आहे. या मेट्रोची मार्गिका राई, मुर्धा आणि मोर्वा गावातून जाणार असल्याने तेथील ५०० घरे बाधित होणार आहेत. यामुळे स्थानिकांनी विरोध केला आहे. यामुळे नव्या कारशेडला उत्तन येथे जागा मिळूनही कामाला सुरुवात झालेली नाही.

हेही वाचा >>> जगभरातील ‘ब्रॅण्डेड’ कपडयांचे उत्पादनकेंद्र भिवंडीत; विदेशातील बाजारपेठांमध्येही तयार कपडयांची निर्यात

मीरा भाईंदर शहरासाठी मेट्रो प्रकल्प-९ चे काम एमएमआरडीएतर्फे हाती घेण्यात आले आहे. त्याच्या मार्गिका ७ आणि ७ (अ) साठी भाईंदर पश्चिम येथील राई, मुर्धा आणि मोर्वा गावात कारशेड उभारली जाणार होती. परंतु या कारशेडला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केल्याने शासनाने तो रद्द केला. या विरोधामुळे मेट्रोचे काम रखडले होते. दरम्यान कारशेडच्या जागेवर तोडगा निघाला आणि उत्तन-डोंगरी येथील जागा स्थानिकांच्या सहमतीने निश्चित करण्यात आली. कारशेड उभारण्यासाठी एमएमआरडीएने २ हजार ६१ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास मंजुरी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएला डोंगरी येथील सरकारी जागेचा आगाऊ ताबादेखील दिला आहे. त्यामुळे  मेट्रोचे काम वेगात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मेट्रोची  मार्गिका राई, मोर्वा आणि मुर्धा गावातून आहे. त्यामुळे या परिसरातील ५४७ घरे बाधित होणार असल्याने ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. यामुळे मेट्रोचे काम पुन्हा रखडले आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी विलंब..

मागील तीन वर्षांपूर्वी भाईंदर मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. हा प्रकल्प ६ हजार ७०० कोटी रुपयांचा होता. प्रस्तावित नियोजनानुसार ही मेट्रो साधारण २०२४ च्या डिसेंबर महिन्यात सुरू होणार होती. नवीन कारशेड उभारण्यास तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे भाईंदर मेट्रो प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी विलंब होणार आहे.