प्रत्येक शहराची एक वेगळी, वैशिष्टय़पूर्ण संस्कृती असते. शिवाय ही संस्कृती प्रत्येक प्रहरी बदलत जाते. सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री शहरी संस्कृतीचे वेगवेगळे दर्शन घडत असते. मुंबई, ठाण्यापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या उल्हासनगरचीही एक वेगळी संस्कृती आहे. व्यापार, व्यवसाय आणि औद्योगिक वेगळेपणाबरोबरच एक स्वच्छंदी जीवनशैली इथे अनुभवता येते. इथल्या जीवनशैलीत खाद्यसंस्कृतीला विशेष महत्त्व असून उल्हासनगरमध्ये दिवसा आणि रात्रीही त्याचा पुरता अनुभव इथे येणाऱ्यांना मिळतो. खवय्यांना पोटभर खाण्याचा अनुभव देण्यासाठी उल्हासनगर पहाटे लवकर उठते, तर रात्री उशिरापर्यंत जागे असते. पहाटे तीन वाजता सुरू होणारी येथील खाद्ययात्रा मध्यरात्रीनंतरही सुरूच असते. दाल पकवान, बटर पापडी, रुमाली रोटी, सन्ना पकोडा, बटर पापडी अशा सिंधी खाद्यपदार्थाच्या जोडीला भेलपुरी, पाणीपुरी, खिमा पॅटिस, पाया सूप, कलेजी, स्पेशल मलाई कुल्फी, मालपोवा, गुलाबजाम, गाजर हलवा आणि फालुदा या पदार्थाची अस्सल लज्जत उल्हासनगरमध्ये अनुभवता येते.
उल्हासनगरचा गोलमैदान परिसर, सेक्टर १७ परिसर, श्रीराम नाका, शहाड परिसरातील रस्ते हे मध्यरात्रीही या भागात येणाऱ्या खवय्यांच्या गर्दीने गजबजलेले असतात. व्यवसाय, धंदा संपवून घरी जाताना या भागातील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थाच्या गाडय़ांवर खवय्यांची गर्दी उसळते. खरेदीसाठी निघालेल्या महिलाही या खाद्यपदार्थाची लज्जत चाखतात. संध्याकाळी सुरू होणाऱ्या या खाद्ययात्रेला रात्रीच्या सुरुवातीपासूनच रंग चढायला लागतो. अनेक मंडळी घरातून जेवणखाण उरकून खास पाणीपुरी, शेवपुरी, स्वीट डिशेस आणि आइसक्रीम खाण्यासाठी बाहेर पडतात. शहरातील नेताजी चौकामध्ये रात्री उशिरापर्यंत खाण्यासाठी जमणाऱ्यांची गर्दी असते. उत्तररात्रीपर्यंत ही गर्दी हटत नाही.  
सिंधी खाद्यसंस्कृतीत दालपकवानला विशेष स्थान आहे. उल्हासनगरमध्ये कोणत्याही वेळी गेलात तरी तिथे दालपकवान मिळते. शहरातील हातगाडय़ांवर, हॉटलमध्ये हा प्रकार मिळत असून, गरमागरम कुरकुरीत पुरी, थोडी तिखट डाळ आणि चवीला कैरीचे लोणचे याचा खाद्यानुभव काही औरच असतो. रुमाली रोटी हासुद्धा या परिसरातील आणखी एक लोकप्रिय प्रकार. इथल्या गाडय़ांवरचे आचारी हातावर फिरवत रुमाली रोटी बनवून देतात. ती बटरमध्ये घोळवून खाण्याचा आनंद लाजवाब असतो. बटरपापडीचा स्वादही या भागात घेता येतो. उल्हासनगरच्या श्रीराम परिसरात बाहेरगावी जाणाऱ्या गाडय़ा मोठय़ा प्रमाणात सुटत असल्याने हा भाग कायमच गजबजलेला असतो. त्यामुळे या भागात रात्रीच्या कोणत्याही वेळी पोहोचलात तरी तुम्हाला खाण्यासाठी इथले पारंपरिक प्रकार मिळू शकतात. या जोडीला वडापाव, भजी, बुर्जीपाव यांसारख्या पदार्थाच्या गाडय़ाही असतात. सेक्टर १७ परिसरातील खाद्यपदार्थाचे स्टॉल्स खवय्यांचे लक्ष वेधणारे असतात. रात्री उशिरापर्यंत चालणारे हे स्टॉल्स उत्तररात्री दीड-दोनपर्यंत सुरू असतात. ते बंद होईस्तोपर्यंत पहाटे पुन्हा उल्हासनगरच्या अन्य चौकांमध्ये खाद्यपदार्थाचे स्टॉल सुरू होतात. शिवाजी चौक परिसरामध्ये पहाटे तीन वाजल्यापासून खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांची लगबग सुरू होते. त्यामुळे दुकाने उघडण्यासाठी निघालेल्या व्यापाऱ्यांना पुन्हा खाद्यपदार्थ उपलब्ध होतात.