ठाणे : संपुर्ण महापालिका क्षेत्रामध्ये एकूण ४ हजार ३९७ धोकादायक इमारती असल्याची यादी जाहीर करत त्यात ७४ इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट केले होते. या अतिधोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने या इमारतीमधील रहिवाशांना इतरत्र स्थलांतरीत होण्याची नोटीस बजावून अशा इमारती पाडण्याचे काम हाती घेतले होते. प्रत्यक्षात आतापर्यंत २९ इमारतीच रिकाम्या करण्यात आल्या असून उर्वरित इमारतींमध्ये आजही रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहत असल्याची बाब समोर आली आहे. मालकासोबत असलेला जागेचा वाद तसेच इतर विविध कारणांमुळे हे नागरिक घरे रिकामी करण्यास तयार होत असल्याचे पालिका सुत्रांकडून सांगण्यात आले.

ठाणे, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती आहेत. त्याचबरोबर नौपाडा परिसरातील जुन्या अधिकृत इमारती मोडकळीस आल्या आहेत. अशा इमारती पावसाळ्यात कोसळून त्यात जीवितहानी होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून घडत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी तयार करण्यात येते. सी-१, सी-२ए , सी२बी आणि सी३ अशा चार टप्प्यांत धोकादायक इमारतींचे वर्गीकरण करण्यात येते. अशाचप्रकारे पालिका प्रशासनाने यंदाही शहरातील धोकायदायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये संपुर्ण शहरात ४ हजार ३९७ धोकादायक इमारती असून त्यात सुरूवातीला ६७ इमारती सी-१ म्हणजेच  अतिधोकादाक असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने पुन्हा केलेल्या सर्वेक्षणात अतिधोकादायक इमारतींची संख्या वाढली असून अशा इमारतींची संख्या आता ७४ इतकी झाली आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Political Crisis Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना, अतिवृष्टी आणि पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

सी-१ म्हणजेच अति धोकादायक इमारती पावसाळ्यात पडून जिवीतहानी होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन अशा इमारतींचे बांधकाम पाडण्यात येतात. यंदाही पालिकेने ७४ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना नोटीस बजावून सदनिका रिकाम्या करण्यास सांगितले होते. तसेच रिकाम्या झालेल्या इमारतींचे बांधकाम पाडण्याचे कामही पालिकेने सुरु केले होते. त्यामध्ये आतापर्यंत २९ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत, तर, दोन इमारतींचे बांधकाम पाडण्यात आले आहे. ४३ इमारतींमध्ये रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यामध्ये १६ इमारती या कोपरी येथील दौलतनगर भागातील असून त्याठिकाणी १८७ कुटूंब राहतात. या इमारतींच्या पुर्नविकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. तळ मजल्याच्या १० तर, तळ अधिक एक मजल्याच्या १७ सदनिका आहेत. या सर्वच ठिकाणी २२० कुटूंब राहतात, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. या संदर्भात पालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जी.जी.गोदेपुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. मालकासोबत असलेला जागेचा वाद तसेच इतर विविध कारणांमुळे हे नागरिक घरे रिकामी करण्यास तयार होत नाहीत. असे असले तरी या इमारती रिकाम्या करण्याचे काम पालिकेकडून सुरुच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.