ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे केवळ ६० टक्केच पूर्ण झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नाले तुंबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नाले सफाईची कामे वेगाने सुरू असून ३१ मेपर्यंत सगळे काम पूर्ण होतील असा दावा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केला आहे.

महापालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक ठिकाणी नालेसफाई झाली नाही. नालेसफाईची कामे उशिराने सुरू झाल्याने केवळ ६० टक्केच नालेसफाई झाल्याचे समोर आले आहे. येत्या काही दिवसांवर पावसाळा आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नालेसफाई झाली नाही तर, नाले तुंबून त्याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा – यंदाच्या पावसाळ्यात घोडबंदर कोंडीत

आयुक्त राव यांनी सर्वप्रथम, कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाळ काढण्याचा कामाचा आढावा घेतला. रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यांवर जाळ्या बसवाव्यात. त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा. नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यवधींचा खर्च कमी होईल. त्यादृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.

हेही वाचा – Dombivli MIDC Blast: कंपनी परिसरात आढळत आहेत मानवी मृतदेहांचे अवशेष, शोधकार्य आजही सुरुच राहणार

नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच, स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक यांची मदत घ्यावी, असेही राव यांनी सांगितले. उथळसर प्रभाग समितीतील ऋतू पार्क येथील नालेसफाईचे काम राव यांनी पाहिले. कापूरबावडी, थिराणी, वागळे इस्टेटमधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला, सुपरमॅक्स कंपनी लगतचा नाला, परब वाडी येथील नाल्यांच्या सफाईची देखील आयुक्त राव यांनी पाहणी केली. मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे, अशी माहितीही आयुक्त राव यांनी दिली.