ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदर मार्गावर गेल्याकाही दिवसांपासून रस्ता रुंदीकरण, भुयारी गटारांची निर्मिती आणि डांबरी रस्त्यांचे काँक्रीटीकरण कामे सुरू झाली आहेत. या कामांमुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते, अंतर्गत रस्ते विविध प्राधिकरणांकडून खोदण्यात आले आहेत. त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर बसत आहे. येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. रस्ते खोदकामे करण्यात आल्याने घोडबंदरमधील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या कोंडीच्या सामन्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

घोडबंदर मार्ग परिसरात कापूरबावडी ते गायमुखपर्यंत लोकवस्ती वाढली आहे. मुंबईपासून ठाणे शहर तुलनेने जवळ असल्याने या भागात गृहखरेदी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. तसेच गुजरात येथून उरण जेएनपीटी, भिवंडी आणि नाशिक भागात वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूकही घोडबंदर मार्गावरून होत असते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी हा मार्ग महत्त्वाचा आहे. असे असले तरी विविध प्राधिकरणांमार्फत येथे कामे सुरू आहेत. पाच वर्षांहून अधिक काळापासून या मार्गावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या मेट्रो चार या वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या निर्माणासाठी घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. तसेच खोदकामाच्या भोवती पत्रे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य मार्गिका अरुंद झाल्या आहेत. त्याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. असे असतानाच, घोडबंदर मार्गिकेच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, येथील सेवा रस्ते मुख्य मार्गिकेला जोडले जाणार आहेत. ही कामे कासारवडवली भागात सुरू झाली आहेत. येथील दुभाजक आणि सेवा रस्त्यामधील गटारे तोडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कासारवडवली, वाघबीळ भागातील अंतर्गत मार्गिका देखील खोदून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्याचे कार्य सुरू केले आहे. या खोदकामांमुळे वाघबीळ येथील रस्त्याची अक्षरश: धुळधाण झाली आहे.

हेही वाचा – Dombivli MIDC Blast: कंपनी परिसरात आढळत आहेत मानवी मृतदेहांचे अवशेष, शोधकार्य आजही सुरुच राहणार

एकाचवेळी सुरू असलेल्या या कामांचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. मुख्य मार्गिकेवरील धोकादायक प्रवास टाळण्यासाठी अनेक दुचाकीस्वार सेवा रस्त्यांचा अवलंब करत होते. आता सेवा रस्त्यांचे खोदकाम सुरू झाल्याने पावसाळ्यात मोठ्या कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – डोंबिवली स्फोट : कंपनीच्या मालकांना अटक; दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

काही दिवसांपासून सेवा रस्त्यांवर खोदकामे सुरू झाली आहेत. सेवा रस्ते उपलब्ध नसल्याने मुख्य रस्त्यावरून वाहतूक करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा प्रवास जीवघेणा ठरू शकतो. – सागर ढवळे, दुचाकीस्वार, कासारवडवली.