पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे रिक्षामालक संतप्त

भाईंदर : महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनावर कारवाई केली असता ते वाहन पालिकेकडून चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

महानगरपालिकेकडून रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनावर जप्तीची कारवाई केली जाते. ज्या प्रभागाच्या हद्दीत रस्त्यावर वाहने लावली जातात त्या प्रभागाद्वारे कारवाई केली जाते. प्रभाग १ मधील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानजवळ एका रिक्षामालकाने त्याची रिक्षा रात्री पार्क केली होता. पालिकेने ही रिक्षा ११ नोव्हेंबर  रोजी जप्त केली.

रिक्षा जप्त केल्यानंतर त्या मालकाने महापालिकेत १६ नोव्हेंबर रोजी ३००० हजार रुपये दंड भरला. दंड भरल्यानंतर तो त्याची रिक्षा घेण्यासाठी रामदेव पार्क येथे असलेल्या मनपाच्या गोडावूनमध्ये गेला असता तेथे त्याची रिक्षा आढळून आली नाही. दीड महिने उलटले ती रिक्षा सापडतच नाही. गेल्या एक महिन्यापासून त्या रिक्षाचा मालक सर्व अधिकाऱ्यांना भेटतोय; परंतु त्यांना कुणीही उत्तर देत नाही. त्यामुळे नक्की रिक्षा आहे तरी कुठे हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

महानगरपालिकेच्या वाहन गोदामविषयी अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक वेळा येथील वाहनाच्या वस्तू चोरीला जात असून रात्रीच्या सुमारास मद्यपी येथे मद्य सेवन करण्यास बसतात. दरवर्षी महानगरपालिका सुरक्षा रक्षकांकरिता कोटय़वधी रुपये खर्च करते. परंतु पालिकेच्या मालमतेची योग्य देखरेख होत नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे आढळून आले आहे. तसेच प्रभाग अधिकारी सुनील यादव यांना याविषयी विचारणा केली असता ‘मला हे प्रकरण माहिती नाही’ असे सांगून त्यांनी आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

माझ्या रिक्षावर कर्ज आहे. रिक्षाच नसेल तर मी कर्ज कसे फेडणार. शिवाय पालिकेने दंड घेतला असून रिक्षाची देखरेख व सुरक्षा करणे त्याची जबाबदारी आहे. – मनसुख वाघेला, रिक्षा मालक.