देशभरातील सुमारे ४३ पेक्षा अधिक छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन २९ जानेवारी रोजी डोंबिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेकर सभागृहात होणार आहे. उत्तरांचलमध्ये राहणारे राजेश पंवर, राजस्थानचे शिवकुमार मल्ल्या, अमेरिकास्थित अजित देशमुख अशा काही छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचा यामध्ये प्राधान्याने समावेश आहे.
शहरातील रहिवाशांना थेट जंगलातील निसर्गसौंदर्य व वन्यजीवनाचा आनंद देण्यासाठी ‘इनटू द वाइल्ड’ या वन्यजीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जंगल पर्यटनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘मिड अर्थ’ आणि वन्यजीव व पर्यावरणाला वाहिलेले संकेतस्थळ रानवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असून यंदा प्रथमच देशभरातील ४३ छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. दोनशेहून अधिक छायाचित्रांचा आनंद या प्रदर्शनाच्या माध्यमातून डोंबिवलीतील रसिकांना घेता येणार आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘अस्मिता’ या मालिकेतील कलाकार मयूरी वाघ यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती ‘मिड अर्थ’चे संचालक सुरेंद्र देसाई यांनी दिली.