दत्तात्रय भरोदे
शहापूर : एकीकडे उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे तर दुसरीकडे शहापूर तालुक्यात विहिरी, विंधनविहिरीसह पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची चातकासारखी वाट बघावी लागत आहे. अनेक रोजंदारांना रोजगार बुडवून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दिवसागणिक टँकरसह टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये कमालीची वाढ होत आहे. तालुक्यातील दुर्गम भागातील दऱ्या – खोऱ्यांमध्ये वसलेल्या ४१ गावे आणि १५१ पाडे अशा १९२ गाव-पाड्यांमधील ६१ हजार ४०६ रहिवाशांसाठी ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. माणशी वीस लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी रखरखत्या उन्हात कोरड पडणाऱ्या घशामुळे नागरिकांची तहान भागते का असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई – ठाण्याला पाणीपुरवठा करणारी तानसा, भातसा मोडकसागर ही मोठी धरणे असणारा शहापुर तालुका वर्षानुवर्षे तहानलेलाच राहिला आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी बिकट स्थिती शहापुर तालुक्याची झाली आहे. विशेष म्हणजे, दऱ्या खोऱ्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांतील महिलांना मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणांचे पाणी डोळ्यांना दिसत असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शहापुर तालुक्याची तहान भागवण्यासाठी आता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून पाणी योजना राबविली जात आहे. गुरुत्वाकर्षणावर आधारित ९७ गावे आणि २५१ पाड्यांसाठी सव्वा तीनशे कोटींच्या भावली पाणीयोजनेचे काम सुरु आहे. मात्र, संथ सुरू असलेल्या या योजनेचे पाणी प्यायला कधी मिळणार असा प्रश्न टंचाईग्रस्त गावपाड्यांतील नागरिकांना पडला आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील घातक उद्योगांचे पातळगंगा, अंबरनाथला स्थलांतर ; धोरण ठरविण्यासाठी तीन सचिवांची समिती

यंदाच्या कडाक्याच्या उष्णतेमुळे तालुक्यातील नदी नाल्यांसह विहिरी, बोअरवेल मध्ये पाण्याचे स्रोत आटल्याने टंचाईग्रस्त गावपाड्यांतील महिलांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. गावपाड्यांतील लोकसंख्येनुसार माणशी वीस लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येतो असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी तालुक्यातील ४१ गावे आणि १५१ पाडे अशा १९२ गावपाड्यांना ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुक्यातील कसारा, वाशाळा, फुगाळे, लतीफवाडी, चिंतामणवाडी, डोळखांब, टाकीपठार या दुर्गम भागातील वाडी वस्त्यांमधील महिलांना पाण्याच्या टँकरची चातकासारखी वाट बघावी लागत आहे.

तालुक्यातील चिंतामणवाडी येथील नाविनवाडी, पारधवाडी, नारळवाडी, लतीफवाडीसह बहुतांश वाडी-वस्त्यांमधील पुरुष, महिलांना रोजंदारी बुडवून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाच – सहा तास अक्षरशः फरफट होत आहे असे लतीफवाडीच्या उपसरपंच रुपाली सदगीर यांनी सांगितले. अनेकदा पदरचे पैसे मोजून खाजगी टँकर मागवावा लागत असल्याचे नाविनवाडी येथील सुनीता सदगीर यांनी सांगितले.