ठाण्यातील कासारवडवली परिसरातील घरात झोपलेल्या बालिकेला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला शनिवारी पोलिसांनी अटक केली. जयेश कांबळे (२६) असे या आरोपीचे नाव असून तो साईनाथनगर येथे राहणारा आहे.
साईनगरातील एका घरात सहा वर्षांची बालिका सोमवार ३१ ऑगस्ट रोजी रात्री आईसोबत झोपली होती. पहाटे अडीचच्या सुमारास आरोपी जयेश हा दरवाजा उघडून आत शिरला. त्याने झोपेत असलेल्या बालिकेचे तोंड दाबून तिला उचलून घेतले. त्यानंतर त्याने तिला कासारवडवली येथील महापालिकेच्या उद्यानात नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. बालिकेच्या आईला हा सारा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा सारा प्रकार कळाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता.
आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, शनिवार, ११ सप्टेंबर रोजी पीडित बालिका तिच्या आईवडिलांसह वडवली गावात भाजी आणण्यासाठी जात होते. त्याचवेळी साईनगर नाल्याजवळून जात असताना तेथील एका शिडीवर आरोपी बसला होता. पीडित बालिकेने त्या तरुणाची माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी या आरोपीला अटक केली.
कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी ही कारवाई करण्यात आली. बालिकेने सांगितलेल्या वर्णनाच्या २० ते २५ तरुणांची तपासणी केल्यानंतर या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.