सूरज परमार आत्महत्या प्रकरण

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा तपासणी अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून प्राप्त होताच ठाणे पोलिसांनी अहवालाच्या आधारे आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अहवालात ज्या राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे उघड झाली आहेत, त्यांच्या विरोधात सोमवारी दिवसभरात कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याप्रकरणी विविध अंगांनी तपास सुरू असून साक्षी-पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
याप्रकरणी १० ते १२ महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब नोंदविले आहेत. याप्रकरणी आर्थिक व्यवहारासंबंधी पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी परमार यांचा मोबाइल आणि लॅपटॉप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.चिठ्ठीतील खोडलेल्या नावांमध्ये महापालिकेतील चार बडय़ा नगरसेवकांची नावे असल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. मात्र ही नावे कोणती आहेत, याची कोणतीही माहिती उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. हा तपासाचा भाग असल्याचे सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तपासकार्यात अडथळे येण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून या नावांबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तपासाकरिता चार विशेष पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी महापालिकेकडून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यात सर्वसाधारण सभा; तसेच स्थायी समितीच्या बैठकांमध्ये कॉसमॉस समूहाच्या प्रकल्पासंबंधी झालेल्या चर्चा आणि त्यासंबंधी घेण्यात आलेले निर्णय आदींचा समावेश होता.

त्या नगरसेवकाचे निलंबन वर्षभरापूर्वीच : मनसे
न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून महापालिकेतील चार बडय़ा नगरसेवकांची नावे असल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये मनसेच्या नगरसेवकाच्या नावाचा समावेश असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. दरम्यान, ज्या तथाकथित नगरसेवकाचे नाव आहे, असे म्हणतात, त्या नगरसेवकाचे एक वर्षांपूर्वीच निलंबन केले आहे, असे स्पष्टीकरण मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी दिले आहे. या प्रकरणाशी पक्षाचा काहीही संबंध नसून सखोल चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.