खाण्यासाठी जगायचे की जगण्यासाठी खायचे हा ज्याचा त्याचा आवडी-निवडीचा भाग आहे. परंतु जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मसालेदार चमचमीत खायचे की तब्येत सांभाळण्यासाठी खायचे, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. पण या दोन्हीचा मध्यम मार्ग सापडत असेल तर..? मीरा रोडच्या ‘प्रो डाएट किचन’मध्ये तुमच्या जिभेची चवही जपली जाते आणि तुमची तब्येतही. शरीराच्या तंदुरुस्तीबाबत दक्ष असणाऱ्यांसाठी तर नक्कीच ‘प्रो डाएट किचन’ला भेट द्यायला हवी. प्रथिने, काबरेदके आणि मिळणारी ऊर्जा यांचे उत्तम संतुलन येथील वेगवेगळ्या पदार्थामधून साधले जाते.

मीरा रोडच्या शांती पार्क भागात हॅपी होम कॉम्प्लेक्समध्ये सहा महिन्यांपूर्वीच जितेंद्र अगरवाल या तरुणाने प्रो डाएट किचन सुरू केले आहे. नोकरी व्यापात शारीरिक व्यायाम करू न शकणाऱ्या, परंतु तरीही शरीर तंदुरुस्त ठेवण्याची इच्छा असणाऱ्यांपासून ते शरीर सौष्ठवपटूंपर्यंत अनेकांची पसंती आज या किचनला आहे. जितेंद्र अगरवाल स्वत: व्यायामशाळेत जायचे, तेव्हा त्यांनाही आहारतज्ज्ञांनी आहाराबाबत सल्ला दिला होता, परंतु तो पाळणे त्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे असा संतुलित आहार स्वत:च करून त्याचा पुरवठा का करू नये, अशी कल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यातूनच प्रो डाएट किचनचा जन्म झाला. आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणी मिळणारे पदार्थाचे कॉम्बिनेशन तयार करण्यात आले आहे.

नियमित व्यायाम करणाऱ्यांना प्रथिनांची अतिशय गरज असतेच, शिवाय ऊर्जा मिळण्यासाठी योग्य त्या प्रमाणात चरबीयुक्त पदार्थाचेही सेवन करणे आवश्यक असते. त्यामुळेच येथील प्रत्येक पदार्थात प्रथिने, काबरेदके, चरबी आणि ऊर्जा यांचे प्रमाण किती असावे हे नक्की करण्यात आले आहे. इथला प्रत्येक पदार्थ ऑलिव्ह ऑइलमध्येच तयार केला जातो शिवाय सफेद मिठाचा वापर अजिबात केला जात नाही आणि साखरेऐवजी ‘शुगर फ्री’चा वापर केला जातो. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारांमध्ये हे पदार्थ उपलब्ध आहेत.

प्रथिने योग्य प्रमाणात मिळावीत यासाठी विशिष्ट प्रकारची सँडविच या ठिकाणी तयार केली जातात. या सँडवीचमध्ये सोयाबीन, पनीर, चिकन, अंडी, चीज, टुना हा पाश्चात्त्य पद्धतीचा मासा, लसूण आदींचा वापर केला जातो. हल्लीच्या तरुणांमध्ये विविध प्रकारच्या रॅपचे फार आकर्षण आहे. त्यामुळे रॅपची चव जपत त्यात आरोग्यदायी पदार्थ वापरले जातात. शिवाय रॅपची पोळी बनविण्यासाठी मैद्याचा वापर न करता शुद्ध गव्हाच्या पिठाचाच वापर केला जातो.

आरोग्य जपण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची आणि फळांची सरबते आवश्यकच आहेत. त्यामुळे बीट, गाजर, संत्री, कलिंगड यांची सरबते तर या ठिकाणी आहेतच, शिवाय शरीरातील टाकाऊ द्रव्य बाहेर काढण्यासाठी आणि व्यायाम सुरू करण्याआधी घ्यायची सरबतेही या ठिकाणी उपलब्ध आहेत. येथील विविध फळांच्या स्मुदीज आणि भाज्यांची आणि चिकनची सूपही आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी तत्पर आहेत. प्रथिनांची मात्रा जास्त हवी असेल तर त्यांच्यासाठी चिकन गार्लिक, चिकन टिक्का लेमन, एग व्हाइट, मेक्सिकन पनीर अवाकाडो, टुना फिश ही मांसाहारी तसेच कडधान्ये, लेटय़ुस, मशरूम, पातीचा कांदा, पनीर, काकडी, टोमॅटो, विविध प्रकारची फळे यांपासून तयार केलेली सॅलडदेखील याठिकाणी तयार केली जातात.

शरीरसौष्ठव स्पर्धेची तयारी करण्यासाठी अधिक चरबीयुक्त आहाराची गरज असते. किटो डाएटच्या माध्यमातून ही गरज भागवली जाते. या आहारातल्या चरबीयुक्त आहारातून अधिकाधिक ऊर्जा शरीराला दिली जाते. या ठिकाणी मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थातून शरीराला नेमके किती प्रमाणात प्रथिने, काबरेदके, चरबी आणि ऊर्जा मिळणार आहे, हे येथील मेन्यूकार्डवर नमूद करण्यात आले असते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या गरजेनुसार यातील पदार्थाची निवड करणे शक्य होते. याव्यतिरिक्त आवश्यकता असेल तर विशिष्ट प्रकारचे जेवणाचे पॅकेजही ‘प्रो डाएट’मध्ये उपलब्ध आहे.

प्रो डाएट किचन

  • शॉप क्र. ६, हॅपी होम कॉम्प्लेक्स, शांती पार्क, मीरा रोड (पूर्व)
  • वेळ – सकाळी ८ ते रात्री ११