लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : एमआयडीसी क्षेत्रात पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर, उद्योगांना चालना मिळेल. यामुळे एमआयडीसीमध्ये केवळ चांगली कंपनी असून चालणार नाही. तर, त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना दळण-वळणासाठी चांगले रस्ते, पायाभूत सुविधा द्या, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिले.

वागळे इस्टेट येथील एमआयडीसीच्या भुखंडावर बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, साहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विजय राठोड, एमआयटीएलचे एम.डी. श्री.मल्लिकनेर उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी आपण सर्वसामान्यांना अपेक्षित असलेले सरकार स्थापन केले. आपले राज्य गुंतवणुकीला अनुकूल आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणुक होऊ लागली आहे. यावर्षी ३ लाख ७३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. महाराष्ट्रात उद्योगवाढीला वाव आहे. उद्योग क्षेत्र वाढले पाहिजे. तरूणांना रोजगार उपलब्ध झाले पाहिजे. उद्योजकांसाठी चांगले धोरण असले पाहिजे. त्यामुळे त्यांना व्यवसाय करताना अ्डचणी येणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी कार्यक्रमात बोलताना सांगितले.

आणखी वाचा-डोंबिवलीतील फडके रोड फलक मुक्त, बेकायदा फलकांवर पालिकेची कारवाई

राज्य सरकार हरित हायड्रोजन, स्वच्छता अभियान, इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देत असल्यामुळे प्रदुषण कमी होत आहे. परदेशातील उद्योजक महाराष्ट्राकडे विश्वासाने बघत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारला पाठबळ आहे. त्यामुळे परवानग्यांना तात्काळ मंजूरी मिळते. डबल इंजिन सरकार राज्यात आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता योजनेमध्ये मागील सरकराच्या काळात अडीच कोटी रुपयांचे वाटप झाले होते. परंतु मागील दीड वर्षांत सुमारे १८० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. हे पैसे जनतेचे असल्याचे शिंदे म्हणाले. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २ कोटी ८ लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहायला नको म्हणून सरकार दिवसरात्र काम करीत आहे, असे शिंदे म्हणाले.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एमआयडीसीच्या ४५० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. तसेच एमआयडीसीतील सेवा निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोग्य योजना लागू करण्यात आली. एमआयडीसी कर्चमचाऱ्यांच्या ८ ते १० वीमध्ये शिकणाऱ्या मुलांना टॅबचे वाटप करण्यात आले.

आणखी वाचा-दहिसरमधील गोळीबार हा उबाठा गटामधील गँगवॉर, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आरोप

टेंभीनाक्यावर वाढदिवस साजरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त शुक्रवारी टेंभीनाका येथील आनंदाश्रमात जाऊन शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण केला. याठिकाणी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा स्विकारल्या. याठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्यामुळे वाहतुक पोलिसांनी टेंभीनाक्याच्या दिशेने जाणारा मार्ग सायंकाळी वाहतुकीसाठी बंद केला होता. या मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली होती. अचानकपणे करण्यात आलेल्या वाहतुक बदलामुळे विविध मार्गावर काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Provide infrastructure in midc areas chief minister eknath shinde orders officials mrj
First published on: 09-02-2024 at 20:47 IST