भाजप नेते सत्तेत आल्यापासून तोंडाले येईल ते बोलत सुटले असून थापा मारण्यात भाजप नेते पटाईत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी केली. डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हजारो कोटींच्या पॅकेजच्या थापा मारण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचे राज यावेळी म्हणाले. ‘थापांना’ पर्यायी शब्द ‘भाजपा’ असल्याचा टोलाही राज यांनी लगावला. भाजपला उमेदवार मिळेनासे झाल्याने पैसे वाटून उमेदवार विकत घेण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप राज यांनी यावेळी केला. पुतळे उभारत बसण्यापेक्षा आधी जिवंत माणसांकडे लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात पुतळा उभारण्याऐवजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचाही पुनरुच्चार राज यांनी केला.
पंतप्रधान मोदींवरही राज यांनी निशाणा साधला. पुढचं पुढे पाहून घेऊ या मानसिकतेतून शक्यतेच्या पलिकडच्या घोषणा करून टाकायच्या आणि लोकांना अच्छे दिनाच्या स्वप्नांत भूलवायचे काम नरेंद्र मोदी करीत असल्याचे शरसंधान राज यांनी केले. शंभर दिवसांत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणाऱया मोदींना सत्तेत येऊन शंभर दिवस होऊन गेले अजूनही ‘अच्छे दिन’ काही दिसत नाही, असे राज म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray criticises bjp
First published on: 09-10-2015 at 20:53 IST