स्वच्छता, अवयवदानासाठी जनजागृती करणारा अवलिया

रमेश डोंगरे हे टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत तज्ज्ञ तंत्रज्ञ म्हणून सेवानिवृत्त झाले

रमेश डोंगरे हे टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत तज्ज्ञ तंत्रज्ञ म्हणून सेवानिवृत्त झाले.

सात वर्षांपासून गळ्यात फलक अडवून रेल्वे स्थानकात भटकंती

पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकात एक अवलिया गृहस्थ असे विविध जनजागृतीचे संदेश देणारे फलक घेऊन दररोज फिरत असतो. तब्बल सात वर्षे नित्यनियमाने त्यांची ही अनोखी जनजागृती सुरू असते. रमेश डोंगरे असे या ६८ वर्षीय अवलिया गृहस्थाचे नाव आहे. शहर स्वच्छ ठेवा, ध्वनिप्रदूषण करू नका, अवयवदान करा आदी संदेश ते या फलकातून देत फिरत असतात.

रमेश डोंगरे हे टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत तज्ज्ञ तंत्रज्ञ म्हणून सेवानिवृत्त झाले. दोन उच्चशिक्षित विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार. सेवानिवृत्त म्हणून निर्वाह भत्ता चांगला मिळतो. पण आपण समाजाचे काही तरी देणे लागतो हे सतत त्यांच्या मनात होते. वृद्धत्वाकडे झुकलेला एकटा जीव काय करणार. पण समाजासाठी काही तरी करायचं म्हणून डोंगरे यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला. त्यांनी दोन मोठे फलक बनवून घेतले. त्यावर कचरा करू नका, ध्वनिप्रदूषण करू नका, अवयवदान करा अशा आशयाचे संदेश लिहिले. हे फलक गळ्यात अडकवून ते रेल्वे स्थानकात फिरू लागले. २०१०पासून त्यांनी या अनोख्या जनजागृतीला सुरुवात केली ती आजही सुरू आहे. दररोज एक तास ते विविध रेल्वे स्थानकात फिरत असतात.

ट्रेनमध्ये असताना ते छोटा फलक गळ्यात अडकवतात तर स्थानकात उतरल्यावर हा मोठा फलक गळ्यात घालतात. त्यांच्या या विचित्र पेहरावाकडे पाहून लोक थांबतात. त्यांचा फलक वाचतात.  नित्यनियमाने विविध रेल्वे स्थानकात स्वच्छता, अवयवदान आदींचे महत्त्व सांगत फिरत असतात. हे काम करण्यास मला कुणी सांगितलं नाही. मी कुठल्या पक्षात नाही की संस्थेत नाही. एक नागरिक म्हणून मी हे कार्य करतो आणि जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोपर्यंत करत राहणार असे त्यांनी सांगितले.

दररोज एक तास जनजागृतीसाठी

जनजागृती करण्यात मला मुळीच लाज वाटत नाही. मी रेल्वेचा मासिक पास काढला आहे. घरची जबाबदारी सांभाळून मी दररोज एक तास काढतो. मी घोषणा देत नाही, की भाषण करत नाही. कुणी बोलायला आलो की त्यांना स्वच्छतेचं आणि अवयवदानाचं महत्त्व पटवून देतो. अवयवदान करण्यासाठी अर्जही देतो. माझी दोन्ही मुले आणि सुनांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. पण तिनेही या जनजागृतीच्या कामाला पाठिंबा दिला असे रमेश डोंगरे सांगतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ramesh dongare unique public awareness for cleanliness and organ donation