उल्हासनगरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीडित तरुणी ही उल्हासनगर येथे आजीसह राहते. ती शिर्डी येथे आईला भेटण्यासाठी गेली होती.

Rape-1
प्रातिनिधीक फोटो

मुंबई : उल्हासनगर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या स्कायवॉकवरून जात असलेल्या १५ वर्षीय मुलीला हातोड्याचा धाक दाखवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.  आरोपीने तरुणीला रात्रभर कोंडून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी श्रीकांत गायकवाड (३०) या आरोपीला अटक केली आहे.

पीडित तरुणी ही उल्हासनगर येथे आजीसह राहते. ती शिर्डी येथे आईला भेटण्यासाठी गेली होती. तेथून शुक्रवारी रात्री ती उल्हासनगर रेल्वे स्थानकात आली. रात्री ९ वाजता स्थानकातून बाहेर पडून ती स्कॉयवॉकवरून घरी निघाली होती. यावेळी तिला तिचे दोन मत्र भेटले. ती त्यांच्याशी बोलत असतानाच आरोपी श्रीकांत तेथे आला. त्याच्या हातात हातोडासदृश वस्तू होती. त्याने त्याचा धाक दाखवल्यानंतर त्या दोघांनीही तेथून पळ काढला.  त्यानंतर आरोपीने पीडितेला जबरदस्ती ओढत रेल्वे स्थानकाजवळील अल्बर्ट पार्किंगच्या मागील बाजूस असलेल्या एका खोलीत नेले आणि तिच्यावर लैंगिक  अत्याचार केले. सकाळी आरोपी तेथे नसल्याचे लक्षात येताच तिने तेथून पळ काढला. रस्त्यावर येताच तिने एका व्यक्तीकडून मोबाइल घेऊन मित्राला फोन केला. मित्राने पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देताच ती त्याच अवस्थेत हिल रोड पोलीस ठाण्यात गेली.

ही घटना रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडली असल्याने हिल रोड पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी पीडितेला घेऊन रेल्वे पोलीस ठाण्यात गेला. रेल्वे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून पीडितेने केलेल्या वर्णनावरून आणि खबऱ्याच्या माहितीवरून आरोपीला दुपारी ४च्या सुमारास अटक केली.

स्कायवॉक असुरक्षित…

उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर पोलीस तैनात नसतात. तसेच त्या परिसरात कोणताही सीसीटीव्ही बसवलेले नाहीत. त्यामुळे गुन्हेगार टोळक्यांचा वावर वाढल्याचे सांगितले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rape of a minor girl in ulhasnagar akp

ताज्या बातम्या