उन्हाळी सुट्टी म्हटली की महिनाभर शाळा बंद हा प्रकार आता बदलू लागला असून सुट्टीतील शाळा ही विद्यार्थी, पालकांबरोबरच शैक्षणिक संस्थांची गरज बनू लागली आहे. त्यामुळे क्रीडा, साहित्य आणि कला या विषयांचे विविध उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना शाळेशी जोडण्याचा प्रयत्न शाळा करू लागल्या आहेत. तर काही व्यावसायिक संस्थांच्या मदतीनेही असे उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे, डोंबिवली आणि कल्याण शहरातील काही शाळा या व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची रुजुवात करण्याकरिता प्रयत्न करीत आहेत. उन्हाळी शिबिरे, कार्यक्रम सगळेच भरवतात, मात्र विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या ग्रंथालयांची कवाडे उघडून विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या जगामध्ये नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न या शाळा करू लागल्या आहेत.
पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये मुलांसाठीच्या पुस्तकांचा आणि ग्रंथालयांचा प्रकार फारसा रुळलेला नाही. शाळांमधून, घरांमध्ये वाचनाची सवय लावली जाण्यासाठीही प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होणेही दुरापास्त होते चालले आहे. संगणकीय खेळ, मोबाइलच्या जंजाळात विद्यार्थी अडकू लागल्याने ‘वाचन वगैरे नको रे बाबा’ असा विचार मुलांमध्ये वाढीस लागत आहे. त्यामुळे मुलांना वाचन संस्कृतीचा लळा लहान वयातच लागण्याची गरज ओळखून कल्याणच्या काही शाळांनी यंदाच्या सुट्टीच्या काळात ग्रंथालये विद्यार्थ्यांना खुली करून त्यांना अभ्यासाची दालने उपलब्ध करून दिली आहेत. कल्याणचा सुभेदारवाडा हायस्कूल यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असून यानिमित्त शाळेने विविध उपक्रम वर्षभर राबवले आहेत. ग्रंथालयाची सुविधा सुट्टीच्या काळातही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शाळेचे विद्यार्थी ठरलेल्या वेळात शाळेमध्ये येऊन ग्रंथालयाच्या दालनामध्ये हव्या असलेल्या पुस्तकांचे वाचन, अभ्यास करू शकतात. आवश्यकता भासल्यास ही पुस्तके घरी नेण्याची सुविधा असली तरी शाळेतच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा हा मुख्य उद्देश आहे. याबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांना काही प्रश्न असल्यास आणि माहितीसाठीही शिक्षकांना आपले प्रश्न विचारण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संजय नलावडे यांनी दिली. याबरोबरच कल्याणमधील शारदा विद्यामंदिर, सरस्वती विद्यामंदिर, नूतन हायस्कूल, अभिनव विद्यामंदिर, छत्रपती शिक्षण संस्थेच्या कल्याण, डोंबिवलीतील शाळा, ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिर, न्यू इंग्लिश स्कूल, बेडेकर विद्यामंदिर या शाळांनी ग्रंथालये सुटीच्या काळात सुरू ठेवण्यात आली होती.