ठाणे : महापालिका क्षेत्रातील आरक्षित भूखंडांवरील अतिक्रमणे तसेच बेकायदा पार्किंग केलेली वाहने हटविण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील पाहाणी दौऱ्यादरम्यान दिले.
ठाणे शहरातील जांभळी नाका, मुख्य मार्केट परिसरातील स्वच्छतेसह मलनि:सारण प्रकल्प, रस्ते दुरुस्ती, गटारे अशा कामांची पाहणी आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी सोमवारी सकाळी केली. शहरातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अशी वाहने तात्काळ हटविण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले.
मुख्य बाजारपेठेतील पेढय़ा मारुती मंदिर ते टॉवर नाकापर्यंत नाला बांधणे तसेच या भागातील नाला मोठय़ा प्रमाणावर मातीने भरला असून त्याची साफसफाई तातडीने सुरू करण्याचे आणि वापरात नसलेले विद्युत खांब निष्कासित करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. मार्केट परिसरातील भूमिगत मलवाहिन्यांमधील अडथळे दूर करणे, सरस्वती अपार्टमेंट ते वैभव ट्रेिडग रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण करणे, महात्मा फुले मंडईबाहेरील सर्व अतिक्रमणे निष्कासित करून विहित कार्यपद्धतीनुसार मंडईमधील ओटय़ांमध्ये पुनर्वसन करणे तसेच नियमित साफसफाई ठेवणे, पंडित जवाहरलाल नेहरू बालउद्यानामध्ये किरकोळ दुरुस्ती आणि इतर कामे करणे, उद्यानासमोरील पार्किंगचे आरक्षण भूखंड विकसित करण्याची कार्यवाही करणे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
नागसेननगरमधील पाच ते सहा गल्ल्यांमध्ये टाइल्स बसविणे, शौचालय दुरुस्ती करणे, कामगार वसाहत ते मुख्य रस्त्यापर्यंत मलवाहिनी टाकणे, खारटन रस्त्यालगत दोन शौचालयांमध्ये वीज मीटर बसविणे, पार्किंगकरिता आरक्षित भूखंडाभोवती भिंत बांधणे, तसेच भूखंडामध्ये नियमितपणे दुरुस्तीचे कामकाज करून १५ मेपर्यंत कार्यशाळा विभागाकडील कार्यालय या ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. खारटन रोड परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेली घरे, तळ अधिक एक मजली धोकादायक इमारतीमधील ३० भोगवटादार तसेच लफाट चाळीतील ६० अधिकृत भोगवटादारांचे परिसरातील झोपडपट्टी विकास योजने अंतर्गत पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे तसेच लफाट चाळीतील उर्वरित सुमारे ६० अनधिकृत भोगवटादारांविरुद्ध विहित कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
ठाणा कॉलेजलगत उद्यानाचे आवश्यक लँडस्केपिंग, झाडांच्या फांद्यांची छाटणी, उद्यानांमध्ये थीम पेंटिंग तसेच खारटन रोड परिसरातील महापालिकेच्या भूखंडावर तसेच कदम कंपाऊंडमधील आरक्षणे विकसित करणे तसेच सिडको बस स्टॉपसमोरील नाल्याची भिंत बांधणे व नाल्यावरील अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेशही त्यांनी संबधितांना दिले.
दरम्यान ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी बॅकअपची प्राथमिक चाचणी सुरू असून आयुक्त डॉ. शर्मा यांनी या बसमधून सोमवारी सर्व अधिकाऱ्यांसमवेत प्रवास केला.
अनधिकृत भोगवटादारांविरुद्ध कारवाई
लफाट चाळीतील ६० अधिकृत भोगवटादारांचे परिसरातील झोपडपट्टी विकास योजने अंतर्गत पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे तसेच लफाट चाळीतील उर्वरित सुमारे ६० अनधिकृत भोगवटादारांविरुद्ध विहित कारवाई करण्याचे आदेशही आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी यावेळी दिले.