डोंबिवली : महापालिका प्रशासनाच्या ढेपाळलेल्या कारभाराचे चटके गेल्या काही दिवसांपासून येथील रहिवाशांना प्रखरतेने बसू लागले आहेत. संथगतीने सुरू असलेली काँक्रिट रस्त्यांची कामे, जागोजागी उघडी पडलेली गटारे, निकृष्ट दर्जाचे पदपथ, गॅस कंपन्यांच्या वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले नवे आणि चांगले रस्ते यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
येथील नागरी समस्यांविषयी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचा अभियंता विभागाने साधी दखलदेखील घेत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. उड्डाणपूल, कोटय़वधी रुपयांचे विकास प्रकल्पांना भेटी देत विकासाच्या गप्पा कुटणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी दैनंदिन भेडसावणाऱ्या या प्रश्नांची उकल शोधण्याकडेही लक्ष द्यावे अशी चर्चाही जोरात सुरू झाली आहे. या नागरी समस्यांचा सर्वाधिक त्रास प्रवासी, निवृत्त, ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक होतो.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात वीरा शाळे समोरील रस्ता काँक्रीटीकरणासाठी खोदण्यात आला आहे. आगरकर रस्त्यावरील गल्लीतील रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. फडके रस्ता, टिळक रस्ता यांना जोडणाऱ्या मोतिलाल नेहरू पथावरील रस्त्याचे काम रखडले आहे. ही कामे संथगतीने सुरू असल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांना वळसा घेऊन जावे लागत आहे.
टिळकनगरमधील खंडकर गल्लीतील रस्ते काम करताना या भागातील जलवाहिनी जेसीबीचा फटका बसून तुटली आहे. या भागातील मलवाहिन्यांचे चेंबर भरून वाहत आहेत. नेहरू रस्त्यावरील जोशी शाळेजवळ नवीन डांबरीकरणाचा रस्ता गॅस वाहिन्या टाकण्यासाठी ठेकेदाराने खोदल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील वर्दळीमुळे उडणाऱ्या धुरळय़ाचा शाळा, परिसरातील सोसायटय़ांना त्रास होतो. जोशी शाळा ते ठाकुर्ली रेल्वे फाटका दरम्यान रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत.
फडके रस्त्यावर मदन ठाकरे चौकात पदपथावरील झाकण तुटले आहे. अपघात टाळण्यासाठी एका व्यापाऱ्याने तुटलेल्या झाकणावर गॅस शेगडी ठेवली. काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावरील दोन्ही बाजूचे पदपथ ठेकेदाराने माजी नगरसेवकाच्या सांगण्यांवरून काढून टाकले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता वाहने उभी केली जातात.
गल्लीतील रस्त्यावरून चालणे, वाहने नेणे जिकिरीचे झाले आहे, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत. मानपाडा रस्ता, टिळक रस्ता, घरम्डा सर्कल ते माऊली सभागृहा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असतात. अनेक वेळा रस्त्यांवर कोंडी होते. पालिकेच्या कचरावाहू वाहनांमधील निचऱ्याचे पाणी रस्त्यावर पडत असल्याने दुर्गंधीने प्रवासी हैराण आहेत. टिळक रस्त्यावरील मोतिलाल नेहरू पथावरील भुयारी वीज वाहिनी जेसीबीच्या धक्क्याने खराब झाली. या वाहिनीजवळ मंगळवारी रात्री दीड वाजता स्फोट झाला. परिसराचा वीज पुरवठा पहाटेपर्यंत बंद होता, अशी माहिती रहिवाशांनी दिली. यासंबंधी वारंवार तक्रारी करूनही अभियंता विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.


काँक्रीटीकरणाची कामे योग्यरितीने सुरू आहेत. ही कामे लवकर पूर्ण होतील यादृष्टीने ठेकेदाराला सांगण्यात आले आहे. –व्ही. एस. पाटील, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, डोंबिवली

जोशी शाळा ते ठाकुर्ली रेल्वे फाटका दरम्यानच्या रस्त्यावरील दिवे चालू आहेत. तांत्रिक अडचणीमुळे ते बंद असतील तर ते तात्काळ सुरू केले जातील. -भागवत पाटील, उपअभियंता,विद्युत विभाग, डोंबिवली