scorecardresearch

डोंबिवली: ठाकुर्ली खंबाळपाडा-कांचनगाव मधील कोट्यवधीचा कर भरणा करणारे रहिवासी रस्त्याच्या प्रतीक्षेत

कल्याण डोंबिवली पालिका आमच्याकडून मालमत्ता, पाणी कराच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधीचा महसूल जमा करते.

A dirt road in the development plan in Thakurli
(ठाकुर्ली कांचनगाव मधील विकास आराखड्यातील धुळीचा रस्ता.)

नवी डोंबिवली म्हणून विकसित झालेल्या येथील ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागातील खंबाळपाडा, कांचनगाव, कचोरे, भोईरवाडी भागातील महापालिकेच्या विकास आराखड्यातील अंतर्गत रस्ते पालिकेने विकसित करावेत, अशी जोरदार मागणी कांचनगाव, ९० फुटी भागात नवीन गृहसंकुलात राहण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांकडून केली जात आहे.

कल्याण डोंबिवली पालिका आमच्याकडून मालमत्ता, पाणी कराच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधीचा महसूल जमा करते. रस्ते सुविधा देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ का करते, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. नव्याने विकसित होत असलेल्या ठाकुर्ली, चोळे, कांचनगाव, खंबाळपाडा, कचोरे, भोईरवाडी भागात विकास आराखड्यात अनेक रस्ते प्रस्तावित आहेत. उद्याने, बगिचे, क्रीडांगण, शाळा, मैदान अशी विविध प्रकारची आरक्षणे या भागात अस्तित्वात आहेत. रस्ते विकासा बरोबर पालिकेने या भागातील रहिवाशांच्या सुविधेसाठी उद्यान, बगिचे, मैदाने विकसित करावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत. या भागात रस्ते नाहीच पण विकास आराखड्यात प्रस्तावित असलेली आरक्षणेही ‘गायब’ होत असल्याने रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.या भागात नवीन गृहसंकुलांना बांधकाम परवानग्या देताना नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना आरक्षणे ‘गायब’ होत असल्याचे दिसत नाहीत का, असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत.

हेही वाचा >>>बेशिस्त रिक्षाचालकांमुळेच कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडी, नागरिकांचा आरोप; RTO दुर्लक्ष करत असल्याचीही तक्रार

९० फुटी रस्त्याला जोडून अंबर विस्टा, मंगलमूर्ती गृहसंकुलाकडून कांचनगाव, भोईरवाडीकडे जाणारा रस्ता विकास आराखड्यात प्रस्तावित आहे. हा रस्ता मातीचा आहे. तरीही या रस्त्यावरुन दररोज नागरिक मधला रस्ता म्हणून येजा करतात. हा रस्ता पालिकेे स्वनिधी किंवा या भागातील विकासकांच्या माध्यमातून विकसित करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. अंबरविस्टा, मंगलमूर्ती रस्त्याचा विकास झाला तर या रस्त्यावरुन दररोज शंखेश्वर पार्क, भोईरवाडी परिसरातील दोन हजाराहून अधिक नागरिक वाहनाने प्रवास करतील. या रस्त्याने पत्रीपुल मार्गे कल्याणला जाणे आणि भोईरवाडीतून शिवसेना शाखेमार्गे टाटा पाॅवर शिळफाटा रस्त्याला जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे.

हेही वाचा >>>दस्त नोंदणीतून ठाणे जिल्ह्याची विक्रमी वसुली; ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी ग्रामीणमध्ये सर्वाधिक दस्त नोंदणी

अंबर विस्टा संकुला समोरील रस्ता मातीचा ओबडधोबड असल्याने तुरळक नागरिक त्याचा वापर करतात.पालिकेच्या एका अभियंत्याने सांगितले, अंबरविस्टा संकुला समोरीलआराखड्यातील रस्ता टप्पा दोन नियोजनातून करण्याचे प्रस्तावित आहे. या रस्त्याचे काम या भागातील विकसकांकडून त्यांना काही सवलती देऊन करता येईल का याचाही विचार केला जात आहे. यामुळे पालिकेच्या निधीची बचत होऊन त्या निधीतून इतर रस्ता करणे शक्य होणार आहे. विकासकांनी उभारलेल्या गृहसंकुलांमधून त्यांनी घरे विकलेले लोकच येजा करणार आहेत. ही आपली पण जबाबदारी आहे. असाही विचार विकासकांनी करावा यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

“कांचनगाव मधील आराखड्यातील अंबरविस्टा रस्ता टप्पा दोन मधून तयार करण्याचे नियोजन आहे. हे काम या भागातील विकासकांच्या माध्यमातून करता येते का याचेही प्रयत्न सुरू आहेत.”- मनोज सांगळे,कार्यकारी अभियंता,डोंबिवली.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 15:52 IST

संबंधित बातम्या