ठाणे येथील गोखले मार्गावरून जात असलेल्या ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) बसच्या मागील चाकाखाली सापडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. हा अपघात नेमका कसा झाला, हे अद्याप उघड झालेले नाही. मात्र, या वृद्धेला अचानक चक्कर येऊन ती टीएमटीच्या बसखाली सापडली, असे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

उषा विनयकुमार रेवणकर (६७) असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव असून ही महिला ठाण्यातील मनोरुग्णालय परिसरात राहते. रेवणकर या सोमवारी दुपारी गोखले मार्गावरून ठाणे स्थानकाच्या दिशेने जात असताना ठाणे स्थानक-मनोरमानगर या टीएमटीच्या बसच्या मागील चाकाखाली त्या सापडल्या. या अपघातात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. या रस्त्याजवळच एक खासगी रुग्णालय असल्याने पादचाऱ्यांनी एका स्ट्रेचरच्या मदतीने रेवणकर यांना उपचारासाठी तेथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, ही महिला रस्त्यावर जात असताना चक्कर येऊन खाली पडली. नेमके त्याच वेळेस तेथून जाणाऱ्या टीएमटीच्या बसच्या चाकाखाली ती सापडली, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र, अपघाताचे नेमके कारण पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.