scorecardresearch

कल्याणमधील सराफांकडून भिशी योजनेतून ग्राहकांची २९ लाखांची फसवणूक

दोन सरफांविरोधात गुन्हा दाखल

(प्रातिनिधिक छायाचित्र)

कल्याण मधील एका सराफाने भिशी योजनेच्या माध्यमातून दहा ग्राहकांची वाढीव व्याजाचे आमिष दाखवून २८ लाख ९१ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ग्राहकांच्या तक्रारी वरून महात्मा फुले पोलिसांनी दोन सराफांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रोहितकुमार सोनी आणि श्रवणकुमार सोनी या दोन सराफांच्या विरुद्ध गुंतवणूकदार तुकाराम पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. पाटील हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. याशिवाय इतर ९ गुंतवणूकदारांनी देखील फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे.

पोलिसांनी सांगितले, साई श्रद्धा ज्वेलर्सचे रोहित कुमार आणि श्रवण कुमार यांनी ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२२ या कालावधीसाठी आकर्षक व्याज देणारी भिशी योजना जाहीर केली होती. आकर्षक व्याजाच्या आमिषाने दहा ग्राहकांनी या गुंतवणूक योजनेत एकूण ८७५ ग्राम सोन्याचे दागिने गुंतवले. ११ महिन्यानंतर ग्राहकांना आकर्षक व्याज मिळणे अपेक्षित होते. मात्र ते न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी आपली मूळ ठेव परत देण्याचा तगादा ज्वेलर्सकडे लावला. वारंवार मागणी करूनही सराफ गुंतवणूकदारांच्या मागणीकडे लक्ष देत नव्हते. आपण ठेवलेल्या गुंतवणुकीचा सराफांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून अपहार केला आहे, असे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून महाराष्ट्र वित्तीय ठेवीदारांचे हीत कायद्यानुसार सराफांच्या विरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक रज्जाक शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rs 29 lakh fraud from two jewelers in kalyan msr