शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पाश्र्वभूमीवर ‘व्हिजन डोंबिवली’चा उपक्रम
डोंबिवलीतील महिला, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची कार्यशाळा व्हिजन डोंबिवली या संस्थेमार्फत घेण्यात येत आहे. एखाद्या भुरटय़ाने हल्ला करून गळ्यातील सोन्याचा ऐवज पळवून नेण्याचा प्रयत्न केला तर त्यास कसे रोखावे याचे खास प्रशिक्षण महिला, मुलींना दिले जात आहे. शहरातील प्रत्येक महिला स्वयंप्रशिक्षित झाली तर डोंबिवली सुरक्षित, भयमुक्त होईल असा विश्वास ‘व्हिजन डोंबिवली’तर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. डोंबिवलीच्या विविध भागांत भर रस्त्यात स्वरसंरक्षणासाठी उपयोगी ठरतील, अशी ज्युदोची प्रात्यक्षिके युवक, युवतींनी यावेळी दाखविली.
स्वच्छ डोंबिवलीबरोबर सुरक्षित डोंबिवली हेही ‘व्हिजन डोंबिवली’चे मुख्य उद्दिष्ट आहे. व्हिजनतर्फे रविवारी संध्याकाळी भागशाळा मैदान, फुले चौकातील रेतीभवन, इंदिरा चौक, फडके रस्ता या भागात व्हिक्टरी ज्युदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या युवक, युवतींनी ज्युदोची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. मुली व महिलांवर रस्त्यातून जात असताना अचानक एखाद्या भुरटय़ा चोराने पाठीमागून येऊन गळ्यातील सोन्याचा दागिना पळविण्याचा प्रयत्न केला, हल्ला केला तर अशा वेळी संबंधित महिलेने काय करायचे, याचे प्रात्यक्षिक या युवक, युवतींनी करून दाखविले. प्रतिस्पध्र्याचा काही क्षणात बीमोड करण्याची ही कला पाहून अनेक महिला, पुरुष भारावून गेले. ‘आम्हाला या प्रशिक्षणाचे धडे द्या,’ अशी गळ उपस्थितांमधील काही महिला, पुरुषांनी व्हिजनच्या कार्यकर्त्यांना घातली. सात ते आठ मुला, मुलींचा चमू एकमेकांना भर रस्त्यात खाली पाडून स्वसंरक्षणासाठी करीत असलेल्या क्लृप्त्या, युक्त्या पाहून उपस्थित आश्चर्य व्यक्त करत होते.
प्रत्येक महिलेने असे स्वसंरक्षणाचे धडे घेतले. भुरटय़ा चोरांचा जागीच महिलाच बंदोबस्त करू लागल्या तर भुरटय़ा चोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. . प्रत्येक शाळेत अशा प्रकारची स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात येणार आहेत. पावसाळा सोडून इतर आठ महिन्यांत रस्त्यांवर अशा प्रकारची प्रात्यक्षिके दर महिन्याला करून दाखविण्याचा मानस आहे, असे व्हिजन डोंबिवलीचे समन्वयक डॉ. उल्हास कोल्हटकर व प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी सांगितले. मुली, महिलांवरील वाढते हल्ले, ऐवज चोरीच्या वाढत्या घटना पाहता, स्वसंरक्षणाचा एक प्रशिक्षण अभ्यासक्रम व्हिक्टरी ज्युदोने तयार केला आहे.
प्रत्येकाने असे स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत.आपल्या शरीरातील प्रत्येक भागाचा शस्त्र म्हणून वापर करता येऊ शकतो, हे या अभ्यासक्रमातून शिकता येणार आहे असे, लना ओक मॅथ्यू यांनी सांगितले. महिला, मुलींनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, व्हिजन डोंबिवलीने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self defence lessons for women in dombivali
First published on: 24-05-2016 at 06:12 IST