पाच दिवसांचा साठा; ठाणे, कल्याण, डोंबिवलीत दोन दिवसांत खडखडाट

ठाणे : जिल्ह्य़ात करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यानंतर स्थानिक प्रशासनाने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला असला तरी सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात १ लाख २३ हजार ८४० इतकाच लशीचा साठा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. ठाणे शहरात दोन दिवस, कल्याण-डोंबिवलीत दोन ते तीन दिवस, भिवंडी आणि बदलापूरमध्ये पाच दिवस, अंबरनाथमध्ये एक दिवस आणि ग्रामीण भागात पाच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असून यामुळे नवा साठा उपलब्ध झाला नाहीतर जिल्ह्य़ात लसीकरण मोहीम थांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्ह्य़ात करोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून जिल्ह्य़ात सद्य:स्थितीत ४७ हजार १२६ सक्रिय रुग्ण आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे धास्तावलेले नागरिकही लसीकरण करून स्वत:ला संरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, लसीचा पुरेसा साठा शिल्लक नसल्यामुळे जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम थांबण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्य़ात सद्य:स्थितीत १ लाख २३ हजार ८४० इतकाच लसीचा साठा शिल्लक असून काही पालिका क्षेत्रांत एक ते दोन दिवस तर काही पालिका क्षेत्रांत पाच दिवस पुरेल इतकाच हा साठा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काही दिवसांपुर्वी अशाच प्रकारे जिल्ह्य़ात लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्या वेळेस राज्य शासनाने ठाणे जिल्ह्य़ाला २ लाख ४६ हजार ९८० लशींचा साठा उपलब्ध करून दिला. त्यामध्ये २ लाख ३२ हजार ६७० कोव्हिशिल्ड तर, १४ हजार ३१० कोव्हॅक्सिनचा समावेश होता. हा साठा उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्य़ात वेगाने लसीकरण सुरू झाले होते. मात्र, आता हा साठाही संपत आल्याने तसेच नवीन साठा उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम थांबण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्य़ात लशीच्या उपलब्ध साठय़ाची आकडेवारी

शहर                        कोव्हॅक्सिन      कोव्हिशिल्ड     

ठाणे                           ७३२०              १९३१०

कल्याण-डोंबिवली       ९८९०              ९६१०

मिरा-भाईंदर               ६२९०               ६२५०

नवी मुंबई</strong>                    १५०००            २४५०

उल्हासनगर                   ३५०              ६३७०

भिवंडी                             ०              ८७४०

उपसंचालक कार्यालय     ११२०         ०

जिल्हा आरोग्य केंद्र       ६०४०          २५१००

एकूण                            ४६०१०        ७७८३०

१,८५,६२९   एकूण लसीकरण

६३,०१७    आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचारी

८५, ८१८   ६० वर्षांवरील नागरिक

३६,७९४    ४५ ते ६० वयोगटातील नागरिक