प्रयोगाचे नाव ‘गोष्ट एका दुष्काळाची’
शहरातील अत्यंत गजबजलेल्या परिसरात अचानक कुठूनतरी मुलांचा एक जथ्था अवतरतो. कोणत्याही साहित्याविना ही मुले याच रस्त्यावर क्रिकेट खेळत असल्याचा आभास निर्माण करतात. त्यांचा हा सुरू झालेला खेळ पाहण्यासाठी आजूबाजूने चालणारी पादचारी मंडळी काहीशी थबकतात. या मुलांचे नेमके काय सुरू आहे ही उत्सुकता त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात जाणवत राहते. त्यानंतर ही मुले आपला पवित्रा बदलतात आणि सामाजिक आशय असलेल्या पथनाटय़ाची सुरुवात होते..

पथनाटय़ाच्या सुरुवातीला काही क्रिकेट खेळणारी ही मुले थकून जातात आणि विश्रांतीसाठी एका मोठय़ा झाडाचा शोध घेऊ लागतात. खूप फिरूनही त्यांना कुठेच झाडाचे दर्शन होत नाही. खूप वेळ झाड शोधल्यावर त्यांना दूरवर एक झाड सापडते. झाडाजवळ जाऊन ती मुले झाडाला त्याच्या खाली आराम करू का? अशी विनंती करतात. ते निस्वार्थी झाड त्या मुलांना छाया देत असताना या पृथ्वीवरील हे त्याचे अखेरचे काही दिवस शिल्लक असल्याचे सांगते. मुलांना प्रश्न पडतो की हे इतकं मोठं झाडं असं का बोलतंय? यावर ते झाड लोकांच्या स्वार्थाची कथा इथे विषद करतो. मानवाने त्याच्या स्वार्थासाठी या वृक्षप्रजातीच्या पूर्ण परिवाराला संपवले आणि त्या जागी मोठमोठय़ा इमारती बांधल्या आहेत. या मोठय़ा झाडालासुद्धा थोडय़ा दिवसात कापण्यात येणार आहे. ही कथा ऐकल्यानंतर मुलांच्या अंगावर काटा येतो. त्याच वेळी तिथे आलेली एक चिमणीही झाडे नष्ट होत असल्याने होणाऱ्या परिणामांची जाण मुलांना करून देते. मुलांना या सगळ्या गोष्टी लक्षात येताच ते वृक्षप्रजातीच्या संरक्षणाचा निर्णय घेतात. ‘बिन झाडांचे युग’ या पथनाटय़ाच्या निमित्ताने ठाण्यातील तरुणांनी हा संदेश आता प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यात राहणाऱ्या ज्ञानेश कानडे याला लहानपणापासूनच लिखाणाची आवड होती. वृतपत्रासाठी लेख लिहिणे, गोष्टी लिहिणे अशा काही प्रयोग महाविद्यालय संपल्यावरसुद्धा ज्ञानेश करत होता, पण त्याच्याकडे असलेली ही कला त्याला कुठे सादर करण्याची संधी मिळत नव्हती. त्याच्या लहान भावाने दहावी झाल्यावर समाजसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. ज्ञानेशने ही गोष्ट हसण्यावारी नेली. कारण दहावीतली चार-पाच मुले काय समाजसेवा करणार असा प्रश्न त्याला पडला. ज्ञानेशने त्यांना आपण सगळे मिळून समाजाला बोध मिळेल अशी पथनाटय़े करू असे सांगितले. अजून काही मुलांना त्यांनी जमविले. त्यातून १५ मुलांचा एक गट तयार झाला आणि ज्ञानेशने ‘बिन झाडाचे युग’ नावाचे एक पथनाटय़ लिहिले. त्याचे दिग्दर्शनही ज्ञानेशनेच केले. यातूनच ‘सोशल युनिटी केअर फाऊंडेशन’ या संस्थेची सुरुवात झाली. २६ जानेवारी रोजी ब्रह्माळा तलाव येथे संस्थेचा पहिला प्रयोग झाला. त्याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. तीनशेहून अधिक प्रेक्षकांनी या प्रयोगाला दाद दिली. मुलांचे कौतुक केले. त्यापासून हुरूप आलेल्या या समूहाने अवघ्या एक महिन्यात पथनाटय़ाचे शंभरहून अधिक प्रयोग केले. महापौरांनी ओवळा येथे या मुलांच्या हस्ते शंभर रोपांची लागवड केली.
कुणाकडूनही कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता आणि स्वत:च स्वत:चे खाण्याचे व फिरण्याचे पैसे खर्च करून या मुलांनी हे प्रयोग केले. ढोलकी, पेटी आणि बॅनर हातात घेऊन आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो हा विचार करून या मुलांनी हे प्रयोग केले. हे करता करता ‘स्त्री आरंभ’ नावाच्या पथनाटय़ाला मुलांनी सुरुवात केली आणि हळूहळू संस्थेला चांगले यश मिळू लागले. पथनाटय़ाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या या गटाचे आता ८० हून अधिक विविध कलागुण असलेले सदस्य आहेत. यातील चित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुलांनी एकत्र येऊन ठाणे रेल्वे स्थानकाची रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला. १ एप्रिल २०१६ ला ठाणे स्थानकाच्या भिंतींना रंगरंगोटी करून त्यांनी स्थानकाला गमावलेले वैभव पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. समाजमाध्यम, वृत्तपत्र यांच्या मदतीने संघ अजून मोठा होत आहे. ४५ मुलांनी मिळून अवघ्या ३० दिवसांत १०० हून जास्त चित्रे ठाणे स्थानकाच्या भिंतींवर काढली. सांकृतिक, इतिहास, सामाजिक जागृती अशा अनेक विषयांवरील चित्रे इथे काढण्यात आली. दिवसातील अठरा अठरा तास मुले काम करत होती. सकाळी ९ ते ३, दुपारी ३ ते ९ आणि रात्री १२ ते ६ अशा तीन शिफ्ट्समध्ये रंगरंगोटीचे काम सुरू होते. स्थानक व्यवस्थापकांची परवानगी घेतल्यानंतर या मुलांना प्रायोजकांकडून रंग उपलब्ध करून देण्यात आले. या मुलांनी महाविद्यालयास सुट्टी असल्यामुळे सगळे दिवस विनाशुल्क कामे पूर्ण केली.
रेल्वे स्थानकातील रंगरंगोटीचे काम करत असताना या तरुणांची भेट स्थानकात राहणाऱ्या भटक्या जमातीतल्या काही मुलांशी झाली. हळूहळू ओळख वाढू लागली. त्या मुलांना व्यसनातून मुक्त करून आपल्यात सामावून घेऊन त्यांचीही मदत या गटाने घेतली. ७ मेपासून ही संस्था पुन्हा आपल्या नवीन पथनाटय़ाच्या तयारीला लागणार आहे. प्रयोगाचे नाव ‘गोष्ट एका दुष्काळाची’ असे असून १० मेपासून याचे प्रयोग आपल्याला ठाणे शहरात विविध ठिकाणी पाहायला मिळतील. संस्था पन्नासहून जास्त प्रयोग करणार आहे. प्रयोग करताना ते एक पाण्याच्या टँकरसारख्या दिसणारी दान पेटी घेऊन फिरणार आहेत. ज्यामध्ये जमा होणारी आर्थिक मदत दुष्काळग्रस्त लोकांना पाणी पुरवण्यास होणार आहे.
सागर रणशूर