विद्यार्थी शाळेत, घरी उशिरा पोहच असल्याने पालक, शिक्षक त्रस्त

डोंबिवली– रडतखडत सुरू असलेल्या कल्याण शीळफाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबरीचे रस्ते तांत्रिक अडचणीमुळे ठेकेदाराने ठेवले आहेत. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे शीळफाटा रस्त्याचा काही भाग काँक्रीटीकरणाचा असला तरी काही भाग डांबरीकरणाचा असल्याने प्रवाशांचे विशेष करून विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

काँक्रीटीकरण केलेल्या ठिकाणाहून वाहने सुसाट वेगाने येजा करतात. पण काटई जवळील वैभवनगरी भागातील मोरी, काटई टोल नाका भागात डांबरीकरणाचे रस्ते कायम ठेवण्यात आले आहेत. ज्या भागात रस्ता रुंदीकरणाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तेथील रस्ता ठेकेदाराने रस्ता रुंदीकरणाला मोकळीक नसल्याने डांबरीकरणाचा ठेवला आहे. काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांवरील सहा मार्गिंकामधून वाहने सुसाट वेगाने येऊन डांबरीकरण असलेल्या अरुंद भागात अडकून पडतात. या रस्त्यांवर आता खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून संथगती वाहने धावत असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना त्याचा फटका बसतो. डांबरीकरण भागात वाहनांचा रांगा लागतात.

सकाळ पासून ते मध्यरात्रीपर्यंत हा प्रकार सुरू असतो, असे निळजे, काटई, लोढा पलावा भागातील रहिवाशांनी सांगितले. शीळफाटा रस्त्यालगत डोंबिवली जवळ रुणवाल, मॅरेॅथाॅन अशी अनेक गृहसंकुले उभी राहिली आहेत. या भागातील बहुतांशी मुले लोढा पलावा भागातील बाल विभाग, प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये जातात. अनेक पालकांनी मुलांची सुखरुप प्रवासी वाहतूक होण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली आहे. शाळांच्या बसमधून काही मुले प्रवास करतात. स्वतंत्र व्यवस्था करूनही काटई, निळजे उड्डाण पूल, पलावा चौकातील कोंडीमुळे शाळेच्या बस, विद्यार्थ्यांची खासगी वाहने कोंडीत अडकून पडतात.

वाहन कोंडीमुळे अनेक मुले अर्धा ते एक तास शाळेत उशिरा येतात. त्यांचा अभ्यास बुडतो. कल्याण, बदलापूर, डोंबिवलीकडून येणारे शिक्षक या कोंडीत अडकतात. त्यांचे येजा करताना हाल होतात. शीळफाटा रस्त्यावरील कोंडीने शाळेचे नियोजन बिघडवले आहे, अशा तक्रारी शीळफाटा रस्त्यालगतच्या शाळा चालकांनी केल्या. ठेकेदाराला आहे ती कामे लवकर पूर्ण कर असे या भागातील शाळा चालकांनी अनेक वेळा सांगितले आहे. त्याची दखल घतेली जात नाही, अशी खंत शाळा चालकांनी व्यक्त केली.

मुसळधार पाऊस सुरू आहे. वाहन कोंडीमुळे विद्यार्थ्यांना मुसळधार पावसाचा मारा सहन करत वाहनात गुपचूप बसावे लागते. बाल विभागातील मुलांचे सर्वाधिक हाल होतात. अनेक वेळा मुले घरी येण्यास अर्धा ते एक तास उशीर होतो. त्यामुळे पालक वर्ग हैराण आहे. वाहन चालकाकडून वाहन कोंडीचे कारण सांगितले जाते. मुले घरी येईपर्यंत अस्वस्थता असते, असे रुगवाल, मॅरेथाॅन, काटई, कोळे, डोंबिवली भागातील पालकांनी सांगितले.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून अतिशय संथगतीने वाहतूक होत असल्याने सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर जागोजागी वाहने थबकून असतात. शीळफाटा रस्त्याच्या आजुबाजुला निळजे, कोळे, काटई, देसई, खिडकाळी, पडले मानपाडा गावे आहेत. गावातील रहिवाशांना शीळफाटा मुख्य रस्त्यावर येऊन डोंबिवली किंवा अन्य भागात जायचे असेल तर त्याला एक ते दीड तास गावाच्या वेशीवर प्रतीक्षा करावी लागते, असे काटईचे नरेश पाटील यांनी सांगितले.

अनेक वर्षापासून शीळफाटा रस्त्याचे काम सुरू आहे. लोढा पलावा भागातील रखडलेली कामे ठेकेदाराने लवकर पूर्ण करावीत.या भागातील शाळकरी मुलांचे होणारे हाल कमी करावेत. नोकरदार वर्गाला कोंडीची सवय आहे. लहान मुले सतत वाहनात बसून हैराण होतात. गोपाळ कामत (रुणवाल गृहसंकुल)