इंदिर भटिजा हत्या प्रकरणात दोषी आढळलेला उल्हासनगरचा माजी आमदार व नगरसेवक सुरेश ऊर्फ पप्पू कलानीची जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली. कल्याण सत्र न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी पप्पूसह त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो सध्या पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पप्पूने जन्मठेपेच्या निर्णयाला उच्च, सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने यापूर्वीच त्याची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे तो सर्वोच्च न्यायालयात गेला होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पप्पूची आव्हान याचिका फेटाळून लावत त्याची जन्मठेप कायम ठेवली. त्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणात पुन्हा परतण्याची पप्पूचा स्वप्नभंग झाला आहे.पंचवीस वर्षांपूर्वी पप्पूने आपल्या साथीदारांकरवी उल्हासनगरमधील बडे प्रस्थ इंदिर भटिजा यांची हत्या केली होती. या प्रकरणात ३५ साक्षीदार तपासण्यात आले होते. कल्याण सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश राजेश्वरी बापट-सरकार यांनी पप्पूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र मला झालेली शिक्षा चुकीची आहे, असे सांगत कलानीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.