वाढीव क्षेत्रफळ असलेल्या मालमत्तांना करआकारणी

वसई-विरार शहरातील क्षेत्रफळ वाढवलेल्या मालमत्ताधारकांना करआकारणी करण्यास अखेर महापालिकेने सुरुवात केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नव्या घरपट्टय़ांचे सर्वेक्षण; वसई-विरार महापालिकेच्या तिजोरीत ५० कोटींची भर

वसई-विरार शहरातील क्षेत्रफळ वाढवलेल्या मालमत्ताधारकांना करआकारणी करण्यास अखेर महापालिकेने सुरुवात केली आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत किमान ५० कोटी रुपयांची भर पडणार आहे. एका महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे.

वसई-विरार शहरात ६ लाख ४९ हजार मालमत्ता आहेत. मात्र मालमत्ताचे योग्य करनिर्धारण झाले नसल्याने शेकडो कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फेरावे लागत आहे. शहरातील ३० टक्के मालमत्ताधारकांना चुकीची करआकारणी असल्याची बाब ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणली होती. महापालिकेचे २०१८-१९ या आर्थिक वर्षांत मालमत्ता करापोटी २३० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. २००९मध्ये महापालिका स्थापन झाली, तेव्हा चार नगर परिषद आणि ५२ ग्रामपंचायत हद्दीमधील गावांचा समावेश झाला होता. त्यानंतर मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण झाले नव्हते. अनेक मालमत्तांना चुकीची करआकारणी करण्यात आलेली होती तर अनेक मालमत्तांना करआकारणी करण्यात आलेली नव्हती. अनेक व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांना घरगुती कराचीच आकारणी केली जात आहे. त्यामुळे ते उत्पन्न पालिकेला मिळत नव्हते. महापालिकेच्या सध्याच्या साडेसहा लाख मालमत्तांधील ३० टक्के मालमत्तांना चुकीची करआकारणी होत असल्याचे आढळून आले होते.

ज्यांच्या मालमत्ता हजार चौरस फुटांच्या आहेत, त्यांना केवळ ५०० चौरस फुटाप्रमाणेच करआकारणी होत असल्याचे आढळून येत होते. वालीव आणि पेल्हार प्रभागात अनेक औद्योगिक कंपन्यांनी आपल्या मालमत्तांचे क्षेत्रफळ वाढवले आहे. या मालमत्तांचा ते व्यावसायिक वापर करीत आहेत. मात्र पालिकेला जुन्या क्षेत्रफळाप्रमाणे कर आकारला जाणार आहे. पालिकेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नव्या करआकारणीचा आराखडा तयार करण्यात आला असून वाढीव मालमत्ताधारकांकडून करआकारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एक महिन्याच्या कालावधीत ही करआकारणी केली जाणार आहे.

.. तर कारवाई

* करआकारणीचे काम सर्व ९ प्रभाग समितीमधील साहाय्यक आयुक्तांकडे देण्यात आलेले आहे.

*  मालमत्ताधारकांना नवीन करआकारणी करण्यात आलेली आहे की नाही, त्याची पाहणी स्थायी समितीकडून केली जाणार आहे.

*  त्यात जर कुणाला वगळले असल्यास संबंधित साहाय्यक आयुक्तांवर कारवाई केली जाणार आहे.

कर ग्रामपंचायत काळातील

पश्चिम पट्टय़ातील गावांमधील अनेक घरांचे आता बंगले झालेले आहेत. मात्र त्यांच्याकडून ग्रामपंचायत काळापासूनचा कर आकारला जात आहे. अशा नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन आपले वाढीव क्षेत्रफळ जाहीर करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

महापालिकेचे पहिले लक्ष्य पेल्हार आणि वालीव प्रभाग समितीमधील औद्योगिक आणि व्यावसायिक बांधकामांवर आहे. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने अधिकृत आणि अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. त्यांनी मनमानीपणे अतिक्रमण करून क्षेत्रफळ वाढवून घेतलेले आहे. त्यांच्याकडून नवीन करआकारणी करण्यास सुरुवात केली आहे.

– सुदेश चौधरी, सभापती, स्थायी समिती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Taxation of property with increased area