जुलै महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्रात वन संवर्धन मोहीम राबविण्यात आली. ठाणे परिसरातील महाविद्यालयांनीही ठिकठिकाणी रोप लागवड केली. विशेष म्हणजे केवळ रोप लागवड न करता त्या वृक्षांची जोपासना करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी घेतली. त्या हिरव्या लागवडीचा हा सचित्र वृत्तान्त..

वागळे इस्टेट येथील आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात आंबा, फणस, डाळिंब,  बेल , नारळ, कडुलिंब , पेरू, चिंच, जांभूळ अशा निरनिराळ्या फळांच्या ४०० झाडांची लागवड केली. महाविद्यालयाच्या परिसरात होणाऱ्या वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचे संवर्धन होईलच, शिवाय विद्यार्थ्यांनाही निरनिराळ्या वनस्पतींची माहिती व्हावी, हा यामागे उद्देश असल्याचे मुख्याध्यापकभावसार यांनी सांगितले.

बा.ना.बांदोडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ५०० वृक्षांची रोपटी लावून वन संवर्धनात आपला सहभाग नोंदविला. या उपक्रमास बा.ना.बांदोडकर महाविद्यालयातील बॉटनी विभाग आणि सांस्कृतिक मंडळाचा समावेश होता. मुंब्रा कौसा व्हिलेज येथील ओसाड डोंगरावर वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच कोणताही उपक्रम हा असाच साध्य होत नाही, त्यासाठी मार्गदर्शक असणे आवश्यक असते. बा. ना. बांदोडकर महाविद्यालयातील बॉटनी विभागाचे समन्वयक प्रा. भालचंद्र मांडलेकर, सांस्कृतिक मंडळाचे समन्वयक प्रा. प्रकाश माळी, प्रा. बिपीन धुमाळे आदी प्राध्यापक या वृक्षारोपणासाठी उपस्थित होते. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र बटालियनचे पीआय स्टाफ सतपाल सिंग, सुनील शिंदे तसेच बॉटनी डिपार्टमेंटचे डॉ. शहा यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयातील या वृक्षारोपण सोहळयास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मनोहर न्यायते उपस्थित होते. लवकरच महाविद्यालयाच्या आवारात सॅण्ड बाइंडर यांसारख्या अनेक जातीच्या जमिनीचा कस धरून ठेवणाऱ्या वृक्षांची लागवड करणार असल्याची माहिती समन्वयक प्रा. बिपीन धुमाळे यांनी दिली.

वृक्ष लागवडीचे भान राखत जोशी-बेडेकर महाविद्यालयाने महाविद्यालयाच्या आवारात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ५० वृक्षांची लागवड केली. चिंच, गुलमोहर, बेहडा यांसारख्या वनस्पतींची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शकुंतला सिंग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. प्रफुल्ल भोसले, कल्पना रामदास यांनी सहभाग घेतला.

बांदोडकर महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी ध्यानधारणाविषयक व्याख्यान

ऋषिकेश मुळे, युवा वार्ताहर

बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात प्राध्यापक वर्गासाठी नुकतेच ध्यानधारणेवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या पतंजली सभागृहात हे व्याखान पार पडले. या व्याख्यानात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रबोधक, व्याख्याते व तत्त्वज्ञ डॉ. राजहंस यांनी समस्त प्राध्यापक वर्गाला मार्गदर्शन केले.

ध्यानधारणा ही अशी एक विद्या आहे, जी आपणास कोणत्याही वेळेस कोठेही कधीही वेगळा वेळ न काढता करता येते. त्यामुळे आपल्या मेंदूची क्षमता वाढते. रोजच्या जगण्यात आपण फक्त २० टक्के मेंदूचाच वापर करतो. ८० टक्के मेंदू वापरलाच जात नाही, तो जर वापरला तर आपण जे काम करत आहोत ते ध्यानधारणेमुळे अतिशय वेगळे व उत्कृष्ट असे होऊ  शकते, डॉ. राजहंस  यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.मनोहर न्यायते यांच्या अध्यक्षतेखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.आपली मानसिकता ही आपल्या क्रिया-प्रतिक्रियांवर आधारित असते. मानसिक समाधान, सुख, आनंद या सर्व सापेक्ष बाबी असतात. ठोस वेगळा विचार करून व आजच्या शिक्षण पद्धतीचे अवलोकन करून पुढची पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे अशा व्याख्यानांचा नक्कीच उपयोग होईल, असे प्रतिपादन  राष्ट्रीय छात्र सेनेचे प्राध्यापक बिपीन धुमाळे यांनी केले. यावेळी कनिष्ठ व पदवी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षक उपस्थित होते.

तत्त्वज्ञान प्रात्यक्षिक पुस्तक प्रकाशित

प्रतिनिधी, ठाणे

‘फिजिओलॉजी प्रॅक्टिकल बुक फॉर एसवाय बीएस्सी’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच बांदोडकर महाविद्यालयाच्या पतंजली सभागृहात आयोजित एका समारंभात झाले. बांदोडकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.सी.जी.पाटील आणि मुंबई विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ.स्मिता दुर्वे यावेळी उपस्थित होते. मिठीबाई महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. विनायक दळवी आणि डॉ. विंदा मांजरमकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

विद्यार्थ्यांनी पुस्तके चौकस नजरेने वाचावीत व त्यामधील त्रुटी निदर्शनास आणून द्याव्यात, असे डॉ. दुर्वे यांनी यावेळी सांगितले. एसवाय बी.एस्सीसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या तत्त्वज्ञानाच्या या प्रात्याक्षिक पुस्तकामध्ये काही उणिवा राहून गेल्या असतील तर विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकांना कळवाव्यात; जेणेकरून पुढील आवृत्तीमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.

मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या या उपक्रमात बांदोडकर महाविद्यालयाच्या डॉ.विंदा मांडरमकर यांनी पुस्तकाचे लेखन केल्यामुळे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले, असे गौरवोद्गार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.मनोहर न्यायते यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाला मुंबई, ठाणे व भिवंडी येथील महाविद्यालयांचे प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

वंदे मातरम महाविद्यालयात ‘दावत ए इफ्तार’

ऋषिकेश मुळे

अन्न हे पूर्णब्रह्म या उक्तीला उद्देशून जान्हवी मल्टी फाउंडेशनच्या वंदे मातरम महाविद्यालयात नुकतेच इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. सर्वधर्मसमभाव हा उद्देश ठेवून महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते.वंदे मातरम महाविद्यालयाचे संचालक प्रा.डॉ.राजकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मुस्लीम बांधवांसाठी, विद्यार्थ्यांसाठी  ‘दावत ए इफ्तारचे’ आयोजन करण्यात येते. नमाज आणि भोजन असे इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लीम बांधवांच्या या पवित्र महिन्यात हिंदू-मुस्लीम ऐक्य दिसून यावे, हाच हेतू होता. महाविद्यालयीन मुख्य प्रतिनिधी ललित धानुरकर, सागर शेलार यांच्या प्रयत्नातून दावत ए इफ्तार साजरा झाला.