जमिनीच्या वादातून मंगेश पाटील (२५) याची त्याच्या चुलतभावाने ५० हजार रूपयांची सुपारी देत गळा दाबून हत्या केली. अक्षय पाटील असे चुलत भावाचे नाव असून शिळ- डायघर पोलिसांनी त्याच्यासह त्याचे साथीदार प्रवीण जगताप, राहुल सुर्यवंशी या दोघांना अटक केली आहे.
शिळ-डायघर येथील वावळण गाव भागात मंगेश पाटील हे त्यांच्याकुटुंबियांसोबत राहत होते. १२ एप्रिलला ते पलावा येथे जाण्यासाठीघराबाहेर पडले. रात्री उशीरापर्यंत ते घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार शिळ-डायघर पोलीस ठाण्यात दिली होती.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाचे तपशील काढले असता, उल्हासनगर येथील एक व्यक्तीचे त्यांच्यासोबत मोबाईलवर शेवटचे संभाषण झाल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले असता, त्याने आपला मोबाईल त्याचा मावस भाऊ प्रवीण जगताप याला वापरण्यासाठी दिला होता. अशी माहिती समोर आली. यावर पोलिसांनी प्रवीण जगताप याची सखोल चौकशी केली असता, त्याने मंगेश पाटील याचा चुलत भाऊ अक्षय याच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबूली दिली. त्यासाठी अक्षयने त्यास ५० हजार रुपयांची सूपारी दिल्याचेही समोर आले. पोलिसांच्या पथकाने अक्षय आणि त्याचा मित्र राहुल सर्यवंशी यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

असा केला खून –

प्रवीणने मंगेशला एका मैदानात दारू पिण्यास बोलावले होते. मंगेश हा त्याठिकाणी आला असता, त्याला प्रवीणने दारू पाजली. त्यानंतर अक्षय हा त्याच्या दोन मित्रांसह त्याठिकाणी आला. प्रवीण आणि अक्षयने मंगेशला कारमध्ये बसविले. तेथून त्याला उल्हासनगरच्या दिशेने नेले. तिथे राहुल हा देखील उभा होता. राहुल कारमध्ये बसल्यानंतर मंगेशचा गळा दाबून खून करण्यात आला. तसेच त्याचा मृतदेह मुरबाड रोड येथील निर्जन स्थळी फेकून देण्यात आला.