गावदेवी मैदानाजवळील ‘ठाणे जिल्हा पत्रकार भवन’ अनेक वर्षे ताब्यात ठेवून या भवनाची जागा पुनर्विकासाच्या नावाखाली विकल्याप्रकरणी ठेकेदार राजन शर्मा आणि त्याचा भाऊ किशोर शर्मा या दोघांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शर्मा बंधूंना अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करीत आहेत.
गेल्या काही वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्य़ातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारण्याकरिता राज्य शासनाने गावदेवी मैदानाजवळ भूखंड देऊ केला. त्यानंतर ठेकेदार राजन शर्मा याला भवन उभारण्याचे काम देण्यात आले. मात्र, शर्मा यांनी या जागेची पुनर्विकासाच्या नावाखाली परस्पर विक्री केल्याचे उघड झाले आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक अनिल सिंग यांना ही जागा पुनर्विकासाच्या नावाखाली विकली असून त्यासाठी शर्मा बंधूनी त्यांच्याकडून सुमारे ३२ लाख ९५ हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, जागा ताब्यात मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिंग यांनी  नौपाडा पोलीस ठाण्यात  फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  

ठाण्यात भरदिवसा रोकड लुटली
ठाणे : ठाणे येथील कळवा भागात प्रेमनारायण तिवारी (२६) राहत असून तो शनिवारी दुपारी ठाणे स्थानक परिसरातून पायी जात होता. या भागातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परिसरात तो आला असता, पाठीमागून आलेल्या चोरटय़ाने त्याच्या हातातील कापडी पिशवी खेचून पोबारा केला. या पिशवीमध्ये सुमारे ५० हजारांची रोख रक्कम होती. सतत गर्दीमुळे गजबजलेल्या परिसरात भरदिवसा हा प्रकार घडल्याने चोरटय़ांची हिम्मत आता वाढल्याचे या घटनेच्या निमित्ताने दिसून येते. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला अटक
डोंबिवली : पैशाच्या आमिषाने आपली मुलगी भोंदूबाबा विजय ठोंबरे याच्या ताब्यात लैगिंक सुखासाठी देणारे वडील उमर खान, मुलीची सावत्र आई रेहना खान यांच्यासह या भोंदूबाबाला मानपाडा पोलिसांनी अटक केली. या भोंदूबाबाने अनेक कुटुंबांना मी तुमच्या घरी पैशाचा पाऊस पाडतो. तुम्हाला श्रीमंत करतो अशा बतावण्या केल्या आणि त्या  कुटुंबातील मुलींना लैंगिक सुखाची वासना पूर्ण करण्यासाठी दलाल जानकी हिंडोले हिच्या मदतीने गळाला लावले होते. अशा प्रकारे त्याने २३ मुलींची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.