सुट्टे पैसे नाही.. नंतर घ्या.. तिकिटावर लिहून देतो.. परिवहन कार्यालयातून घेऊन जा.. अशा सूचनावजा आदेश अनेक वेळा बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसवाहकांकडून दिल्या जातात. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही असे ‘आदेश’ मिळतच असतात. सुट्टे पैसे नसल्याने वाहकाला जाब विचारला जात असला तरी वाहकही हतबलता व्यक्त करत असल्याने त्याच्यापुढे प्रवाशांचे काहीच चालत नाही. गेल्या पाच वर्षांत टीएमटीची ‘चिठ्ठी’वरील ही देणी सुमारे ८० हजार रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
या काळात केवळ १४ हजार ९९० रुपयांचा परतावा प्रवाशांना मिळाला आहे. त्यामुळे वाहकांकडे जास्तीची चिल्लर आणि सुट्टे पैसे उपलब्ध करून देण्याची मागणी बस प्रवाशांकडून केली जात आहे.   
tv04‘एसटी’ असो किंवा महापालिकेची बस सेवा, प्रत्येक ठिकाणी सुट्टय़ा पैशांचा खडखडाट जाणवू लागला असून त्यामुळे वाहकाला वारंवार सुट्टय़ा पैशांच्या मागणीची आरोळी ठोकावी लागत असते. तरीही सुट्टे पैसे मिळत नसल्याने नंतर मागून घ्या, असे सांगून प्रवाशांना तिकिटावर लिहून देण्याचा मार्ग बस वाहक अवलंबत असतात. अनेक वेळा सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये खटके उडतात. मात्र वाहक आणि प्रवाशांचाही नाइलाज असल्याने परिवहनच्या कार्यालयातून पैसे घेऊन जाण्याची विनंती वाहक करतो आणि स्वत:ची सुटका करून घेतो. एक, दोन, पाच रुपये, कधी १०, तर कधी ५० रुपयांची रक्कमसुद्धा प्रवाशांना सुट्टय़ा पैशांच्या टंचाईमुळे दिली जात नाही. ही रक्कम घेण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांचा ओघ अत्यंत कमी असून गेल्या पाच वर्षांमध्ये ३ हजार २२७ प्रवासी राहिलेली रक्कम घेण्यासाठी परिवहन कार्यालयात फिरकलेदेखील नाहीत. त्यामुळे ही रक्कम परिवहन कार्यालयामध्ये पडून राहत असून गेल्या पाच वर्षांत अशी सुमारे ७८ हजार ७९८ रुपयांची रक्कम परिवहन प्रशासनाकडे जमा आहे. ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या प्रकरणी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना टीएमटी प्रशासनाने ही माहिती उघड केली आहे.

अडचणीच फार..
प्रवासाच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या सुट्टय़ा पैशांच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी बसवाहकांकडे शंभर रुपयांची चिल्लर दिली जाते. समस्या वाढल्याच्या तक्रारी करण्यात आल्यानंतर ही रक्कम २५० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. तरीही अनेक वाहकांकडे इतकी रक्कम दिली जात नसल्याची तक्रार बसवाहक करतात. ठाणे परिवहनच्या बस प्रवासात सुट्टे पैसे मिळाले नाहीत, तर ते पैसे घेण्यासाठी प्रवाशांना परिवहनच्या वागळे इस्टेट आगारामध्ये जाऊन या रकमेचा परतावा मिळवावा लागतो. त्यामुळे कळवा, कोपरी, घोडबंदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वागळे इस्टेटमध्ये जाणे शक्य होत नाही. अनेक वेळा १० रुपयांसाठी १५ रुपयांचा प्रवास खर्च करून पैसे आणण्यासाठी जाणे अव्यवहार्य ठरते. त्यामुळे प्रवाशांना हे पैसे मिळतच नाहीत. असे शिल्लक पैसे मिळण्यासाठी परिवहनने स्टेशन परिसरातील नियंत्रण कक्षा तसेच अन्य ठिकाणी ही व्यवस्था सुरू केल्यास त्याचा प्रवाशांना लाभ होईल, अशी विनंती ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुयश प्रधान यांनी केली आहे.  
श्रीकांत सावंत, ठाणे