किशोर कोकणे

ठाणे शहरातील सेवा रस्ते तसेच मुख्य मार्गाच्या कडेला उभ्या करण्यात येणाऱ्या खासगी प्रवासी, शालेय बसगाडय़ांमुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूककोंडीत भर पडत आहे. जुन्या ठाण्यात तर अशा बसगाडय़ांच्या पार्किंगमुळे जेमतेम एकेरी रस्ता शिल्लक राहतो. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी अशा बसगाडय़ांसाठी वाहनतळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खारेगाव, घोडबंदर तसेच वर्तकनगर परिसरात जागेचा शोध सुरू आहे.

ठाणे शहरात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठीच्या बसगाडय़ांची संख्या लक्षणीय आहे. अनेक शाळांमध्ये या बस उभ्या करण्याएवढी जागा नसल्याने त्या सार्वजनिक रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात येतात. याखेरीज प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडय़ाही तीन हात नाका तसेच मुंबई-नाशिक महामार्गालगत उभ्या असतात. शहरातील रस्ते विविध प्रकल्पांमुळे आक्रसले असताना या बसगाडय़ांचा त्रासही आता वाढू लागला आहे. दररोज शहरात बेकायदा वाहने उभी राहिल्याने वाहतूककोंडी होत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. शहरात होणाऱ्या वाहतूककोंडीतून तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिकेला बसतळ उभारण्याची विनंती केली होती. तसेच पोलिसांकडून १५ दिवसांपासून विभागवार बसगाडय़ांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील एकूण बसगाडय़ांचा आकडा मिळणार आहे. महापालिका प्रशासनाने खारेगाव, वर्तकनगर आणि घोडबंदर भागातील तीन जागांची पाहणी केली आहे. त्यामध्ये कायदेशीर अडचणी आहेत. त्या दूर झाल्यास या भागात उभ्या करण्यात आलेल्या बसगाडय़ांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

सद्य:स्थिती : ठाणे शहरात एक हजारहून अधिक खासगी बसगाडय़ा आहेत. यापैकी बहुतांश शाळेच्या बसेस आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यानंतर या बसगाडय़ा शाळेच्या बाहेरील रस्त्यावर उभ्या केल्या जातात. वाहतूक पोलिसांनी अनेकदा शाळा प्रशासनाला बसेस शाळेच्या आवारात उभ्या कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. जागेचा अभाव असल्याची कारणे शाळा प्रशासनाकडून दिली जातात. तीन हात नाका भागात मोठय़ा प्रमाणात प्रवासी बसगाडय़ा उभ्या असतात. त्यामुळे रस्त्याचा सुमारे अर्धा भाग या बसेस अडवतात.

ठाणे शहरात बसगाडय़ा रस्त्याला उभ्या करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत असते. महापालिका आणि वाहतूक शाखेकडून या बसेस कुठे उभ्या राहात आहेत त्याची चाचपणी केली जात आहे. बसेससाठी तळ मिळाल्यास वाहतूककोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळू शकेल.

– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा.