घोडबंदर सेवा रस्त्यांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा

पाऊस थांबताच ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जाईल या महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घोषणेला अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हरताळ फासल्याचे चित्र सध्या दिसत असून घोडबंदर येथील सेवारस्त्यासह मुख्य मार्गावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडल्याने प्रवासी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. घोडबंदर मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम रस्ते विकास महामंडळाचे असून महापालिकेने हात वर केले असले तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम कुणाचे याचे उत्तर मात्र शहर अभियंताकडे नसल्याचे चित्र आहे.

या मार्गावरील रस्ता एकीकडे मेट्रोच्या कामामुळे अरुंद झाला आहे. दुसरीकडे सेवा रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मुख्य मार्गावर वाहतूक वळविण्यात आल्याने मुख्य मार्गावर दररोज मोठी कोंडी होत असून या कोंडीचा परिणाम म्हणून वर्तकनगर, पवारनगर, मेडोज यासारख्या अंतर्गत मार्गावरही वाहनांचा भार वाढल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. बडय़ा रहिवाशी गृहसंकुलांसोबतच या भागातून जाणारा घोडबंदर मार्ग हा वाहतुकीसाठीही महत्त्वाचा मार्ग आहे. जड-अवजड वाहनांसाह इतर हलक्या वाहनांचा मोठा राबता या मार्गावर असतो. या मार्गावरून प्रवास करणारा वाहनाचालक हा रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे मेटाकुटीला आला आहे. मानपाडा, कापूरबावडी, चितळसर, माजिवडा, पातलीपाडा, कासारवडवली आणि ओवळा या भागात महामार्गासह सेवारस्त्यावरही प्रचंड खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. नवरात्रीपूर्वी जिल्ह्य़ातील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही मुंबई महानगर विकास प्राधिकरण तसेच रस्ते विकास महामंडळातील अधिकाऱ्यांची समन्वय साधून खड्डे भरा असे आदेश वेळोवेळी दिले आहेत. यासाठी विशेष मोहीम घेण्याची घोषणाही करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र जयस्वाल यांचे आदेश बैठकांपुरतेच मर्यादित राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाऊस थांबला, दिवाळी उलटली तरी घोडबंदर तसेच शहरातील अंतर्गत मार्गावरील खड्डे जैसे थे आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम ठाणे महापालिका करत नसल्याने घोडबंदरवासीयांकडून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला आहे.

वाहतूक कोंडी रोजचीच

घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने या मार्गावरून धिम्या गतीने वाहतूक सुरू असते. येथील रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे या मार्गावरील वाहतूक सकाळी आणि सायंकाळी या ऐन गर्दीच्या वेळेस अधिक धिमी होऊन जाते. दरम्यान सेवा रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाल्याने या मार्गावरील वाहतूक मुख्य मार्गावरून होत असल्याने कोंडीत अधिक भर पडत आहे. यामुळे सकाळ, सायंकाळ येथून प्रवासासाठी निघालेले प्रवासी तासन्तास कोंडीत अडकून पडतात असे चित्र आहे.

अंतर्गत मार्गावरही खड्डे

महामार्ग आणि सेवा रस्त्यांबरोबर शहरातील अंतर्गत मार्गावरदेखील मोठय़ाप्रमाणात खड्डे पडले आहेत. नितीन कंपनी जंक्शन, कामगार नाका, वागळे ईस्टेट येथील रस्ता क्रमांक १६, रस्ता क्रमांक २२, इंदिरानगर, कोरस रस्ता आणि शिवाईनगर या मार्गावरील रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी या मार्गावरील रस्ते ठाणे महापालिकेकडून बुजविण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे या मार्गावर पुन्हा खड्डे पडल्याचे पाहायला मिळत आहे. पाउस थांबला तरी हे खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत.

खड्डे बुजविण्याचे काम ठाणे महापालिकेचे नसून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करत आहे. ठाणे महापालिका संबंधित अधिकाऱ्यांकडून खड्डे बुजविण्याविषयीचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

– रवींद्र खडताळे, शहर अभियंता ठाणे महापालिका