scorecardresearch

अंबरनाथकरांचा पुन्हा श्वास कोंडला ; नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रहिवाशांची घरात कोंडी

येथील मोरिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांकडून सोडण्यात येणाऱ्या वायूंमुळे त्या परिसरात राहणारे नागरिक त्रस्त असल्याचे वारंवार समोर आले होते.

अंबरनाथकरांचा पुन्हा श्वास कोंडला ; नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रहिवाशांची घरात कोंडी
येथील मोरिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांकडून सोडण्यात येणाऱ्या वायूंमुळे त्या परिसरात राहणारे नागरिक त्रस्त असल्याचे वारंवार समोर आले होते

येथील मोरिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांकडून सोडण्यात येणाऱ्या वायूंमुळे त्या परिसरात राहणारे नागरिक त्रस्त असल्याचे वारंवार समोर आले होते. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सायंकाळच्या वेळेस रासायनिक कारखान्यांनी पुन्हा उग्र दर्प असलेल्या वायूंचे उत्सर्जन केले. यामुळे ऐन सणोत्सवात तेथील हजारो रहिवाशांना दारे खिडक्या बंद करून घरातच बसून राहावे लागले. याबाबत स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे(एमपीसीबी) सदस्य सचिव ए. शिंगारे यांना संपर्क करत दोषी कंपन्यांवर कारवाई करण्यासह याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकार्यांना थेट निलंबित करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा >>> टेंभी नाक्याच्या उत्सवाला मुख्यमंत्र्यांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न – शिवसेना ठाणे जिल्हा प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांचा आरोप

अंबरनाथ शहराच्या विकासामध्ये तसेच येथील शहरीकरणामध्ये शहरात असलेल्या तीन एमआयडीसींचा मोठा वाटा आहे. मात्र याच औद्योगिक क्षेत्रात असलेल्या विविध कारखान्यांमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. शहराच्या पश्चिम भागात असलेल्या मोरीवली एमआयडीसीत सर्वाधिक रासायनिक कंपन्या आहेत. याच एमआयडीसी समोर आणि आसपासच्या परिसरात शेकडोच्या संख्येने गृह संकुले उभी राहत आहेत. याच मोरिवली एमआयडीसीतील काही रासायनिक कंपन्यां मागील काही महिन्यांपासून वारंवार उग्र दर्प असलेल्या वायूंचे उत्सर्जन करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याबाबत नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या आहेत. याच पद्धतीने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशीही मोठ्या प्रमाणात उग्र दर्पाचा वायु सोडण्यात आला. त्यामुळे आकाशात मोठ्या प्रमाणात धुर पसरला होता. उत्सवाचा पहिलाच दिवस असल्याने अनेक नागरिक भेटीगाठींसाठी तसेच उत्सव साजराकरण्यासाठी एकत्र जमत होते. मात्र या वायूंचा दर्प असहय झाल्याने सर्व रहिवासी पुन्हा घरी परतले. तसेच दर्प अधिक असल्याने अनेक रहिवाशांनी आपल्या घराची दारे, खिडक्या बंद करत स्वताला घरात कोंडून घेतले. याची माहिती स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यानं मिळताच त्यांनी एमपीसीबीचे सदस्य सचिव ए. शिंगारे यांना संपर्क साधून रासायनिक कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची देखील त्यांनाही मागणी केली. डॉ. किणीकर यांनी संपर्क साधल्यानंतर काही वेळातच कंपनीतून वायु सोडण्याचे थांबवण्यात आले. तर मंगळवारी एमपीसीबीच्या पथकांनी मोरीवली एमआयडीसीत पाहणी दौरे केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या