म्हसा जत्रेतील उत्साहाला उधाण ; गुरांचा बाजार, घोंगडय़ांसाठी प्रसिद्ध; वाहनांचेही प्रदर्शन
परिस्थिती अनुकुल असो वा प्रतिकूल महाराष्ट्रातील ग्रामस्थ ज्या भावनेने आणि निष्ठेने पंढरीच्या वारीत सहभागी होतो, त्याच उत्साहाने सुगीच्या दिवसात ठिकठिकाणी भरणाऱ्या जत्रांचे उत्साहाने स्वागतही करतो. ठाणे जिल्ह्य़ातील सर्वात मोठी जत्रा असा लौकिक असलेल्या मुरबाड तालुक्यातील म्हसा गावी दरवर्षीप्रमाणे यंदाही पौष पौर्णिमैला जत्रा भरली असून दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट काही काळ दूर सारून परिसरातील चार जिल्ह्य़ांमधील ग्रामस्थ जत्रेचा आनंद घेण्यासाठी येथे येत आहेत. ग्रामस्थांप्रमाणेच गेल्या काही वर्षांपासून शहरी भागातील नागरिकही जिवाची चैन करण्यासाठी जत्रेच्या निमित्ताने म्हसा येथे येऊ लागले आहेत.
महाराष्ट्रात भरणाऱ्या सर्वाधिक मोठय़ा जत्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या म्हसा जत्रेत ठाणे, रायगड, पुणे आणि नगर या चार जिल्ह्य़ांतील हजारो भाविक हजेरी लावतात. गेल्या काही वर्षांपासून गावाकडच्या या विंडो शॉपिंगची भुरळ शहरवासीयांनाही पडली असून अनेकजण मौजमजा करण्यासाठी वाट वाकडी करून म्हसा गावी येऊ लागले आहेत.
गृहोपयोगी वस्तूंची हजारो दुकाने हे म्हसा जत्रेचे वैशिष्टय़. महाराष्ट्रातील विविध प्रांतांतील चीजवस्तू या जत्रेत मिळतातच, शिवाय शेजारील गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्थान येथील व्यापारी त्या त्या राज्यातील वैशिष्टय़पूर्ण वस्तू जत्रेतील दुकानांमधून मांडतात. त्यामुळे चोखंदळपणे खरेदी करणाऱ्यांना ही जत्रा म्हणजे मोठी पर्वणी असते. गावाकडची जनता वर्षांतून एकदा मनसोक्त ‘विंडो शॉपिंग’ करण्याची हौस भागवून घेते. गुरांच्या बाजाराप्रमाणेच उत्तम प्रकारच्या घोंगडय़ांसाठीही म्हसाची जत्रा प्रसिद्ध आहे. यंदाही कर्नाटकमधील घोंगडय़ा बाजारात उपलब्ध असल्या तरी वुलनच्या रंगीबेरंगी सतरंज्या आणि सोलापूरच्या चादरींना अधिक पसंती मिळू लागल्याने घोंगडी बाजार यंदा काहीसा थंड आहे.
म्हसा गावात म्हसोबा हे शंकराचे मंदिर आहे. भीमाशंकरच्या तुलनेत हे देवस्थान रस्त्यावर आणि सहज ये-जा करता येण्यासारखे असल्याने येथील वार्षिकोत्सवास जत्रेचे स्वरूप आले. अनेक वर्षे ही परंपरा सुरू असून दिवसेंदिवस जत्रेचे स्वरूप आणि व्याप्ती बदलत आहे. आकाश पाळणे, मौत का कुआँ, नशिबाची परीक्षा पाहणारी झटपट लॉटरी, विविध प्रकारची खेळणी, सौंदर्यप्रसाधने, शाकाहारी-मांसाहारी भोजनाची व्यवस्था असणारी उपाहारगृहे हे सर्व काही जत्रेत आहे. यंदा जनावरांच्या बाजारात काहीसे मंदीचे वातावरण असले तरी इतर चैनीच्या वस्तूंच्या दुकानांभोवती ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
जनावरांना बांधण्यासाठी लागणारे दोरखंड, घुंगरू, शेतीला लागणारी अवजारे या पारंपारिक दुकानांबरोबरच महिंद्र कंपनीचे गाडय़ांचे शोरूमही यंदा जत्रेत आहे.

वाहनतळावर लुटालूट
जत्रेच्या निमित्ताने राज्य परिवहनतर्फे विशेष गाडय़ा सोडण्यात येत असल्या तरी खासगी वाहनांनी जत्रेला येणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा किती तरी अधिक आहे. या गाडय़ा सुरक्षित ठिकाणी पार्क करण्यासाठी स्थानिक तरुणांनी गावाच्या वेशीवरील जागा भाडय़ाने घेऊन तात्पुरते वाहनतळ उभारले आहेत. दुचाकीसाठी ५० तर चारचाकी गाडीसाठी शंभर रुपये आकारले जात आहेत. किमान सात-आठ वाहनतळ आहेत.

Divorce propaganda songs Kawan no New Indian Pop Stars This book
द्वेषाचे सुरेल दूत..
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल