scorecardresearch

टँकरमधून सल्फ्युरिक अ‍ॅसिड उडाल्याने तिघे होरपळले; उल्हासनगरची घटना; टँकरचालक पोलिसांच्या ताब्यात

टँकरचे झाकण सैल असल्याने त्यातील काही रसायन मागून येणाऱ्या वाहनचालकांवर उडाले.

उल्हासनगरची घटना; टँकरचालक पोलिसांच्या ताब्यात

उल्हासनगर : तळोजा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या एका धावत्या टँकरमधून सल्फ्युरिक अ‍ॅसिड बाहेर उडाल्याने या टँकरमागे असलेल्या वाहनांवरील तिघे जण होरपळले़ उल्हासनगर शहरातील श्रीराम चौकात मंगळवारी ही घटना घडली असून  या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी टँकरचालकाला ताब्यात घेतले.

 मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा टँकर श्रीराम चौकातून जात असताना गतिरोधकारवर आदळला. या टँकरचे झाकण सैल असल्याने त्यातील काही रसायन मागून येणाऱ्या वाहनचालकांवर उडाले. टँकरच्या मागून येणाऱ्या दुचाकीवरील भरत वसिटा, कुणाल वसिटा आणि दिलीप पुरस्वानी यांच्या अंगावर टँकरमधील रसायन उडाल्याने तिघेही किरकोळ भाजले, तर रस्त्याच्या बाजूला उभी असलेली एक मोटरसायकलचेही या घटनेत नुकसान झाले. या घटनेनंतर तात्काळ भरत आणि कुणाल वसिटा यांच्यावर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी पाठवण्यात आले, तर दिलीप पुरस्वानी यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले. याप्रकरणी टँकरचालक राकेश राणा याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा टँकर कोणत्या कंपनीतून आणला गेला याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The three escaped after sulfuric acid was blown out of the tanker akp