‘हरित ठाणे’ शहराची संकल्पना असलेल्या ठाणे महापालिकेने दोन वर्षांमध्ये पाच लाख झाडे लावण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याचा शुभारंभ शुक्रवार, ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण  दिनी’ होणार आहे. या मोहिमेमध्ये नागरिक, शाळा, स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था यांचा सहभाग महापालिका करून घेणार आहे.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून आणि महापौर संजय मोरे यांच्या सहकार्यातून ही मोहीम प्रत्यक्षात उतरत असून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमास विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात ओवळा येथील टीएमटी बस डेपो आवारात वृक्षारोपणाने करण्यात येणार असून या वर्षभरात एकूण अडीच लाख झाडे लावण्यात येणार आहेत. यातील एक लाख झाडे महापालिकेच्या वतीने तर दीड लाख झाडे नागरिकांच्या सहभागातून लावण्यात येणार आहेत.