भास्करनगरमध्ये स्वच्छतागृहांची कमतरता

देशभर ‘स्वच्छ भारत’चा नारा देत गावे-शहरे स्वच्छ करण्याची मोहीम आता तिसरे वर्ष पूर्ण करीत असताना, ठाणे महापालिकेच्या हद्दीतील कळवा येथील भास्करनगर परिसरातील नागरिकांना आजही उघडय़ावरच शौचास बसावे लागत आहे. दाटीवाटीने वसलेली लहान घरे, वस्तीच्या बाजूलाच टाकण्यात आलेला कचरा, जनावरांचे मृत अवशेष यांनी पसरलेल्या दरुगधीतून वाट काढत वस्तीच्याच एखाद्या कोपऱ्यात येथील नागरिकांना प्रातर्विधी उरकावा लागत आहे. या ठिकाणी पालिकेने पुरेशी स्वच्छतागृहे न बांधल्याने रहिवाशांवर ही वेळ ओढवली आहे. परंतु, शहर स्वच्छतेच्या नावाखाली भिंतींवर रंगरंगोटी करीत सुटलेल्या पालिकेचे याकडे लक्ष गेलेले नाही.

कळवा पूर्व भागातील भास्करनगर परिसरात वीस ते पंचवीस वर्षे जुनी वस्ती आहे. तिथे साधारण ५० ते ५५ हजार नागरिक राहतात. या परिसरातील नागरिकांसाठी महापालिकेतर्फे दोन मजली एक स्वच्छतागृह बांधून देण्यात आले आहे. मात्र, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात हे स्वच्छतागृह अपुरे पडत आहे. या परिसरातच दूरवर असलेल्या वस्तीसाठी मात्र स्वच्छतागृह नसल्याने  तेथील रहिवाशांचे अक्षरश: हाल होताना दिसत आहेत.  रेल्वे स्थानक परिसरातच प्रातर्विधीसाठी या वस्तीतील नागरिकांना जावे लागत आहे. यामुळे रहिवाशांची विशेषत: महिलांची मोठी कुचंबणा होत आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी केवळ खड्डे

खणून ठेवण्यात आले असल्याचे रहिवाशांनी सांगितले. भास्करनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून महेश साळवी, वर्षां मोरे, प्रकाश बर्डे नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच शिवसेनेच्या मंगला कलंबे निवडून आल्या आहेत. मात्र यापैकी एकाही नगरसेवकाने रहिवाशांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलेले नाही.

दरम्यान, या परिसराची योग्य पाहणी करण्यात येईल. त्यानंतर रहिवाशांच्या मागण्यांनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.

घराजवळचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी येथील रहिवाशांनी पैसे काढून ४० हजाराची झाडे लावली होती. मात्र झाडे लावलेल्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधून देतो, असे सांगून पालिकेकडून येथील झाडे तोडण्यात आली. मात्र अद्याप या परिसरात स्वच्छता गृहाची सोय करून देण्यात आलेली नाही, असे या परिसरातील रहिवाशी कौसर जहाँ यांनी सांगितले.

पाच स्वच्छतागृहे बांधण्यासाठी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव मांडण्यात येईल. २ ते ३ कोटी रुपये महापालिकेतर्फे स्वच्छतागृहांवर खर्च करण्यात येणार आहेत. परंतु भास्करनगर, कोकनेश्वरनगर हा परिसर जंगल खात्यात येत असल्याने येथे बांधकाम करायची परवानगी नाही. त्यामुळे महापालिकेतर्फे येथे बांधकाम करता येत नाही. मात्र उपलब्ध जागेत सोयीसुविधायुक्त स्वच्छतागृहे लवकरच उभारण्यात येतील.

प्रकाश बर्डे, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस