ङजु ने ते सारेच सोने’ किंवा ‘जुने जाऊ द्या मरणालागून’ हे दोन्ही विचार टोकाचे आणि वास्तविकता नाकारणारे आहेत. दोन्ही गोष्टींमध्ये काही बरे आणि काही वाईट आहे. आधुनिक विज्ञानाने मानवी जीवन अधिक सुकर आणि सुलभ केले असले तरी त्याचे दुष्परिणामही आता समोर आले आहेत. त्याचप्रमाणे कालबाह्य़ ठरविले गेलेले आपल्याकडच्या परंपरागत शास्त्रांचे निष्कर्षही आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरे ठरले आहेत. भारतीय परंपरेतील आयुर्वेद हे असेच पाश्चिमात्यांच्या प्रभावामुळे मध्यंतरीच्या काळात दुर्लक्षित राहिलेले शास्त्र. आता जगानेही आयुर्वेदीय चिकित्सा आणि उपाय मान्य केले असले तरी ६०-६५ वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. तत्कालीन आधुनिक भारतीय समाज पश्चिमेकडील नवलाईच्या प्रेमात होता. त्या काळात आयुर्वेद किंवा परंपरागत वनौषधींच्या आधारे बनविलेले एखादे उत्पादन तयार करणे आणि लोकांनी ते वापरावे यासाठी प्रयत्न करणे हे अगदीच प्रवाहाविरुद्ध पोहणे होते. मात्र केशव विष्णू पेंढरकर यांनी ते धाडस केले. वडिलांच्या नावे त्यांनी विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी स्थापन केली आणि त्या माध्यमातून दातांच्या हिरडय़ा मजबूत करण्यास पोषक ठरणाऱ्या वनौषधींपासून दंतमंजन तयार केले. सारे जग आधुनिक रसायनांच्या प्रेमात असताना केशव पेंढरकर मात्र परंपरागत रसज्ञानावर विश्वास ठेवून होते. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ ‘विको वज्रदंती’ची लोकप्रियता त्यातील उपयुक्त घटकांमुळे कायम राहिली, असे म्हणावे लागेल. सुरुवातीची काही वर्षे दंतमंजन तयार करण्याचा पेंढरकरांचा हा उद्योग घरगुती स्वरूपाचा होता. पुढे मागणी वाढत गेल्याने १९६५ मध्ये डोंबिवली औद्योगिक विभागात ‘विको लॅबोरेटरीज’ या कंपनीची स्थापना करण्यात आली. आपल्या या व्यवसायाची धुरा पुढील पिढीने समर्थपणे पेलावी म्हणून त्यांनी मुलगा गजानन याला फार्मसीचे शिक्षण दिले. गजानन पेंढरकर यांनी वडिलांचा विश्वास सार्थ ठरविला. ‘विको’चे पारंपरिक आयुर्वेदिक दंतमंजन त्यांनी पेस्ट स्वरूपातही बाजारात आणले. हळद आणि चंदनाचा वापर करून बनविलेले सौंदर्यप्रसाधन (टर्मरिक क्रीम) हे त्यांचे पुढचे पाऊल होते.

पुढे रासायनिक द्रव्यांचे दुष्परिणाम दिसू लागल्याने ‘हर्बल’वस्तूंना मागणी वाढत गेली. ‘उपाय नको पण अपाय आवरा’ असे म्हणण्याची वेळ आली. आधुनिक जगानेही साईड इफेक्टचे हे कटू सत्य मान्य केले. अमेरिकेने हळदीचे पेटंट मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र रघुनाथ माशेलकर यांनी त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडले. हळदीचे पीक भारतात तयार होते. त्याचे उपयोग परंपरेने सर्वसामान्य भारतीयांनाही माहिती आहेत. त्याचे पेटंट एखादा सातामुद्रापलीकडचा देश कसे काय घेऊ शकतो, हा त्यांचा युक्तिवाद बिनतोड होता. अर्थातच ‘विको’चे माहात्म्य त्यामुळे आपोआपच वाढत गेले.
स्वदेशी उत्पादने बहुराष्ट्रीय संचार
ज्या काळात ‘विको’चा जन्म झाला, त्या काळात देशात शिरकाव केलेल्या विदेशी उत्पादनांपुढे ते टिकाव धरू शकेल, का असा प्रश्न केशव पेंढरकर यांना लोक विचारीत होते. कारण फार मोठय़ा प्रमाणात भारतीय समाज पाश्चिमात्य उत्पादनांच्या प्रभावाखाली होता. मात्र पेंढरकरांना आपल्या उत्पादनावर विश्वास होता. जगभरातही ‘विको’ची उत्पादने विकली जातील, असे ते म्हणत. त्यांची ती भविष्यवाणी खरी ठरली. सध्या जगभरातील ४० देशांमध्ये ‘विको’ची उत्पादने विकली जातात. स्वदेशी उत्पादन असले तरी आता जगभरात त्यांचा संचार आहे. येत्या काही वर्षांत साठ देशांमध्ये ‘विको’ची उत्पादने पोहोचतील, अशी माहिती आता या उद्योगसमूहाची धुरा सांभाळणारे तिसऱ्या पिढीतील संजीव पेंढरकर यांनी दिली.

हळद-चंदनाचा लेप
त्वचेची उत्तम निगा राखण्यासाठी हळद आणि चंदनाचा लेप लावण्याची पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रचलित आहे. ‘विको’ने तो पारंपरिक लेप क्रीम स्वरूपात बाजारात आणला. त्या वेळी बाजारात उपलब्ध असणारी बहुतेक सर्व सौंदर्यप्रसाधने पांढऱ्याशुभ्र रंगाची होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात या पिवळ्या रंगाच्या क्रीमचे फारसे स्वागत झाले नाही. मात्र हळूहळू त्याचे लाभ लक्षात आल्यानंतर ‘विको टर्मरिक स्किन क्रीम’ लोकप्रिय झाले. सध्या सौंदर्यप्रसाधनांमधील ४० टक्के बाजारपेठ विकोने काबीज केली आहे.

लोकप्रियतेचा चढता आलेख
पाश्चिमात्य उत्पादनांच्या स्पर्धेत ‘विको’ केवळ टिकलेच नाही, तर या कंपनीच्या प्रगतीचा आलेख सातत्याने चढताच राहिला आहे. काही वर्षांपूर्वी भारतातील सर्वात लोकप्रिय एक हजार ब्रॅण्डच्या यादीत ‘विको’चा समावेश होता. २०१३ मध्ये सर्वाधिक आकर्षक २५४ ब्रॅण्डच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या विकोने त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी आता २०१५ मध्ये ११८ व्या क्रमांकापर्यंत झेप घेतली आहे. १९८० मध्ये माल्टा सरकारकडून निर्यातीसाठी देण्यात येणारा पुरस्कार ‘विको’ला मिळाला. १९९०, १९९२ आणि २००२ असा तीनदा सर्वोत्तम निर्यातीचा पुरस्कार मिळाला. २००० मध्ये कंपनीला ‘एक्स्पोर्ट हाऊस’ म्हणून मान्यता मिळाली. ९१-९२ आणि ९७-९८ असे दोनदा कंपनीला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले. २००५ मध्ये विको पेस्टला ‘एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स’ (पेटा) या संस्थेकडून देण्यात येणारा प्रॉगी या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. सध्या ५०० कोटींची उलाढाल असलेल्या या कंपनीने लवकरात लवकर एक हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य गाठण्याचे ठरविले आहे.

इतर उत्पादने
दंतमंजन, पेस्ट आणि टर्मरिक क्रीमपुरते मर्यादित न राहता ‘विको’ने काळानुरूप इतरही काही उत्पादने बाजारात आणली आहेत. ‘विको नारायणी’ हे त्यातलेच एक. क्रीम आणि स्प्रे दोन्ही स्वरूपांत उपलब्ध असलेले हे उत्पादन सांधे, स्नायूदुखी, डोकेदुखी, कंबरदुखी, कोरडा खोकला, सर्दी यावरही उपायकारक आहे. विको टर्मरिक शेव्हिंग क्रीम, विको टर्मरिक इन फोम बेस हा फेसवॉश आदी नवी उत्पादनेही ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.
आधुनिक
विपणन तंत्र
उत्पादन पारंपरिक असले तरी ते तयार करण्यासाठी ‘विको’ व्यवस्थापनाने सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ते विपणनाचे तंत्रही योग्य पद्धतीने वापरले आहे. डोंबिवली येथील कंपनीबरोबरच आता नागपूर आणि गोवा येथेही ‘विको’च्या कंपन्या आहेत. तिथे पूर्णत: स्वयंचलित यंत्रांद्वारे उत्पादन घेतले जाते. बदलत्या काळानुसार उत्पादनांमध्ये बदल करण्याचे कंपनीचे धोरण आहे. त्यातूनच मधुमेही रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी ‘शुगर फ्री’पेस्ट उपलब्ध करून देण्यात आली.